पुणे : लस साठा न आल्याने 45 वर्षावरील नागरिकांसाठी आजही लसीकरण नाही
18 ते 44 या वयोगटासाठी सुरू करण्यात आलेल्या लसीकरणाची वेळ ही सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत असणार आहे. ज्या लाभार्थ्यांनी यापूर्वी दोन रुग्णालयाची निवड करत नोंदणी केली असेल अशा लाभार्थ्यांना लस देण्यात येणार आहे.
पुणे -शासनाच्या सूचनेनुसार एक मेपासून पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना कोरोनावरील लसी देण्यास सुरुवात झाली आहे. या लसीकरणासाठी पुणे महानगरपालिकेतर्फे शहरातील कमला नेहरू रूग्णालय आणि राजीव गांधी रुग्णालय या दोन्ही रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय 45 वर्षाच्या पुढील नागरिकांसाठी असलेली पुणे महानगरपालिकेची सर्व लसीकरण केंद्रांवर पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्या कारणाने बंद राहणार असल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले.
18 ते 44 या वयोगटासाठी सुरू करण्यात आलेल्या लसीकरणाची वेळ ही सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत असणार आहे. ज्या लाभार्थ्यांनी यापूर्वी दोन रुग्णालयाची निवड करत नोंदणी केली असेल अशा लाभार्थ्यांना लस देण्यात येणार आहे. केवळ 350 इतक्या लाभार्थ्यांना आज लस दिली जाणार आहे. शहरात महापालिकेची 112 लसीकरण केंद्र आहेत. परंतु पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्यामुळे ही सर्व लसीकरण केंद्र बंद राहणार असून केवळ दोन रूग्णालयात नोंदणी केलेल्या नागरिकांनाच लस मिळणार आहे. ज्या नागरिकांनी नोंदणी केलेली नाही, अशा नागरिकांनी थेट लसीकरण केंद्रावर जाऊ नये. त्यांना लस मिळणार नाही, असेदेखील पुणे महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी रविवारी रात्री ट्विट करून पुणे मनपा हद्दीत सोमवारी कोरोना लसीकरण होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. आपल्या ट्विटमध्ये मोहोळ यांनी "पुणे मनपा हद्दीत 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण उद्या बंद राहणार असून तसेच या उपलब्धतेनुसार पुढील माहिती दिली जाईल. तर 18 ते 44 वयोगटासाठी कमला नेहरू हॉस्पिटल आणि राजीव गांधी हॉस्पिटल येरवडा येथे नोंदणी केलेल्या नागरिकांना लस मिळेल" असे स्पष्ट केले आहे.
तर जोपर्यंत पुणे महापालिकेला लसीचा साठा उपलब्ध होत नाही तोपर्यंत शहरातील 112 लसीकरण केंद्र बंद राहणार आहेत. तर कमला नेहरू रुग्णालय आणि राजीव गांधी रुग्णालय या दोन ठिकाणी केवळ नोंदणी केलेल्या 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींना उपलब्ध कोट्यानुसार लस दिली जाणार आहे. या दोन्ही ठिकाणी सात मेपर्यंत दररोज सुमारे 350 व्यक्तींना लस देता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.