परभणी -जिल्ह्यात कालपासून (मंगळवार) कोरोनाचा एकही नवा रूग्ण आढळून आला नाही. त्यामुळे परभणीकरांना कोरोनापासून काही प्रमाणात दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसात दररोज आढळणाऱ्या कोरोना रुग्णांमुळे जिल्ह्यात चिंतेचे वातावरण होते. मात्र, मंगळवारपासून नव्याने बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या शून्य आहे. तर मागील महिन्यात 1 आणि सोमवारी (1 जून) अशा 24 रुग्णांना रूग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर आज (बुधवार) देखील 6 रुग्णांना सुट्टी मिळाली आहे. शिवाय आज 32 अहवाल देखील निगेटिव्ह आले आहेत.
आतापर्यंत 86 पैकी 28 कोरोनाबाधित रुग्ण ठणठणीत बरे होवून घरी परतले आहेत. तर दोघांचा मृत्यू झाला. सध्या परभणीत 56 रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील मानवत शहरातील 3 आणि जिंतूर तालुक्यातील 1 अशा 4 संशयितांच्या स्वॅबचा अहवाल सोमवारी रात्री पॉझीटीव्ह आला होता. ज्यामुळे जिल्हा प्रशासन अस्वस्थ झाले होते. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या शतकाकडे जाईल की काय, अशी भीती असताना बुधवारी मात्र, नांदेड येथील प्रयोगशाळेकडून एकूण 32 जणांचे स्वॅब अहवाल निगेटीव्ह आले आहे. तर बुधवारी सेलू तालुक्यातील देवगाव फाटा येथील 39 वर्षीय पुरूष, ब्रम्हवाकडी येथील 25 वर्षीय पुरूष आणि चिकलठाणा येथील 25 वर्षीय महिला कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.