मुंबई - कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या धारावीतील रुग्णांची संख्या आता कमी कमी होत आहे. येथील रुग्णवाढ दुप्पटीचा दर 32 दिवसांवर गेला असून आज (शनिवार) येथे कोरोनाचे केवळ 10 रूग्ण आढळले असून ही धारावीच्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. त्यामुळे आता कोरोनामुक्त धारावी हे लक्ष्य मुंबई महानगर पालिकेने ठेवले आहे.
दिलासादायक...! धारावीत 30 मे पासून कोरोनाने एकही मृत्यू नाही
ज्या धारावीत आतापर्यंत 71 मृत्यू झाले आहेत. त्या धारावीत आठवड्याभरापासून एकही मृत्यू झालेला नाही. त्यामुळे ही खूप मोठी दिलासादायक बाब मानली जात आहे.
एप्रिलपासून धारावी पालिकेसाठी डोकेदुखी बनली होती. धारावी ही मुंबईतीलच नव्हे तर आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढल्यास संपूर्ण मुंबईला याचा धोका पोहोचण्याची शक्यता होती. त्यामुळे पालिकेने येथील अनेक परिसर प्रतिबंधित करत सर्व उपाययोजना केल्या. त्यामुळे गेल्या 15 दिवसात धारावीतील रुग्णांचा आकडा 70-80 वरून 18-25 वर आला. तर शनिवारी फक्त 10 नवे कोरोनाचे रूग्ण आढळून आल्याने धारावीकरांना दिलासा मिळाला आहे. यासंदर्भातील माहिती किरण दिघावकर, सहाय्यक आयुक्त, जी उत्तर यांनी दिली आहे. तर शुक्रवारी 17 रूग्ण आढळले होते. लक्षणीय बाब म्हणजे धारावीत 30 मे पासून एकही कोरोनाचा मृत्यू झालेला नाही. ज्या धारावीत आतापर्यंत 71 मृत्यू झाले आहेत. त्या धारावीत आठवड्याभरापासून एकही मृत्यू झालेला नाही. त्यामुळे ही खूप मोठी दिलासादायक बाब मानली जात आहे. तर त्यापुढे जात 15 दिवसांपूर्वी रूग्ण दुप्पटीचा दर 13 दिवस होता तो पुढे 16 आणि नंतर 20 दिवस झाला आहे. तर आता हा दर थेट 32 दिवस झाला आहे. एकूणच धारावीतील परिस्थिती आता सुधारत असून शून्य रूग्ण अर्थात कोरोनामुक्त धारावी हे लक्ष्य असल्याचे दिघावकर यांनी सांगितले आहे.