प्योंगयांग -जगभरातली देश कोरोनावर लस शोधण्याचा रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत. आता कोरोनावर लस विकसीत करत असल्याचा दावा उत्तर कोरियाने देखील केला आहे. उत्तर कोरियाच्या वैज्ञानिक संशोधन परिषदेने हा दावा केला असून क्लिनिकल ट्रायल सुरु असल्याचेही म्हटले आहे.
उत्तर कोरियाच्या विज्ञान तंत्रज्ञान आयोगाच्या ‘मायरे’ या वेबसाईटवर अहवाल प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यानुसार कोरोना लसीच्या क्लिनिकल ट्रायल सुरु असल्याचे वृत्त योनहाप या वृत्तसंस्थेने दिले आहे. एन्जिओटेन्झिन कनव्हर्टींग एन्झाईम -2 (ACE2) चा वापर करून मेडिकल बायोलॉजी इन्स्टिट्यूटच्या अखत्यारित हे संशोधन चालू असल्याचे अहवालात म्हटले आहे.
कोरियाद्वारे विकसित करण्यात येत असलेली लस सुरक्षित असून प्रतिकारक्षमता वाढत असल्याचे प्राण्यांवरील केलेल्या चाचण्यांमधून दिसून आले आहे. या महिन्यापासून क्लिनिकल ट्रायल सुरु करण्यात आल्या आहेत, असा दावा त्यांनी केला आहे. उत्तर कोरियात अद्याप एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नसताना संशोधक लसीची तिसरी चाचणी घेण्याची चर्चा करत आहेत.
देशातली सायन्स अॅकॅडमीतील बायो इंजिनियरिंग विभागही कोरोनावर लस तयार करत असल्याचे अहवालात म्हटले आहे. मात्र, उत्तर कोरियाची आर्थिक आणि वैद्यकीय क्षेत्राची स्थिती लक्षात घेता जगभरातली तज्ज्ञांनी लस संसोधनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कोरोनामधील कोरोना संसर्गाची स्थिती कशी आहे, हे देखील इतर देशांना कळायला मार्ग नाही. मात्र, आता लस तयार करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.