मुंबई- मंत्रालय स्तरीय पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या रौप्य महोत्सवी वर्षा अंतर्गत पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या संकेतस्थळाला नवीन रुप देण्यात आले आहे. या नवीन संकेतस्थळाचे लोकार्पण पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. मंत्रालयातून या विभागाशी संबंधित घेण्यात येणारे लोकहिताचे निर्णय संकेतस्थळाच्या माध्यमातून गतीने जनतेपर्यंत पाहोचतील असा विश्वास मंत्री पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
‘जल जीवन मिशन’च्या अभियान संचालक आर. विमला, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे विशेष कार्य अधिकारी चंद्रकांत गजभिये, कक्ष अधिकारी सरोज देशपांडे, अधीक्षक अभियंता प्रशांत भामरे, नंदनवरे आदी यावेळी उपस्थित होते.राज्यातील ग्रामीण भागात स्वच्छ पिण्याच्या पाणी पुरवठा करणे, त्यासंबंधी धोरणात्मक निर्णय घेणे, अंमलबजावणी करणे, तसेच ग्रामीण भागातील नागरिकांच्या वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छते संवंधित कामकाज विभागाद्वारे हाताळण्यात येते. या कामांची माहीती सुलभतेने नागरिकांपर्यंत पोहोचवावी यासाठी https://water.maharashtra.gov.in नवीन रुप देण्यात आलेली वेबसाईट कार्यरत असेल. मंत्रालयातील मुख्यालयात घेण्यात येणारे नागरिकांच्या हितांचे निर्णय नागरिकांपर्यंत तसेच अंमलबजावणी यंत्रणेपर्यंत त्वरेने पोहोचणे गरजेचे असते.