जळगाव : जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग काही केल्या कमी होत नसल्याचे चित्र आहे. गुरुवारी जिल्ह्यात पुन्हा 244 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या आता 8 हजार 849 इतकी झाली आहे. चिंतेची बाब म्हणजे, गुरुवारी एकाच दिवशी 13 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला. तर, जिल्ह्यात आतापर्यंत 440 रुग्णांचा कोरोनाने बळी गेला आहे.
जळगाव जिल्हा प्रशासनाला गुरुवारी रात्री प्राप्त झालेल्या तपासणी अहवालांमध्ये 244 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले आहेत. त्यात 59 रुग्ण हे अँटीजेन टेस्टमधून निष्पन्न झाले आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहर 42, जळगाव ग्रामीण 9, भुसावळ 14, अमळनेर 8, चोपडा 7, पाचोरा 2, भडगाव 15, धरणगाव 3, यावल 22, एरंडोल 43, जामनेर 21, रावेर 12, पारोळा 16, चाळीसगाव 12, मुक्ताईनगर 9 आणि बोदवड 7 असे एकूण 244 रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या आता 8 हजार 849 इतकी झाली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 5 हजार 630 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. गुरुवारीदेखील 160 रुग्ण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2 हजार 779 रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यातील काहींची प्रकृती चिंताजनक आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 440 जणांचे बळी -
जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 440 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणजेच, कोविड रुग्णालयात सर्वाधिक 299 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात 93, गोल्डसिटी हॉस्पिटलमध्ये 6, गणपती हॉस्पिटलमध्ये 5, चिन्मय हॉस्पिटलमध्ये 1, जामनेर आणि मुक्ताईनगरात प्रत्येकी 1, पाचोरा 6, चोपडा 7, अमळनेर 2 तर चाळीसगावात 4 अशा एकूण 440 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. गुरुवारी 13 जणांचा मृत्यू झाला. त्यात जळगाव शहरातील 6, एरंडोल आणि यावल तालुक्यातील प्रत्येकी 2 तसेच रावेर, पाचोरा आणि जामनेर तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.