काठमांडू -नेपाळचे पंतप्रधान के. पी शर्मा ओली यांनी आज (बुधवारी) मंत्र्यांशी सल्ला मसलत करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक घेतली. काल (मंगळवार) सत्ताधारी नेपाळ कम्युनिस्ट पक्षाच्या (एनसीपी) नेत्यांनी ओली यांचा तत्काळ राजीनामा मागितला आहे. भारताबरोबरच्या सीमा वादानंतर आमचे सरकार पाडण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप ओली यांनी नुकताच केला आहे.
पक्षाचे वरीष्ठ नेते पुष्प कमल दहल, माधव नेपाळ, झलनाथ खनाल, भीमदेव गौतम यांनी पंतप्रधान ओली यांना राजीनामा मागितला आहे. अनेक प्रश्न हाताळताना पंतप्रधानांना अपयश आल्याचे नेत्यांचे म्हणणे आहे. हिमालयन टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, एनसीपी पक्षाने मंगळवारी बैठक बोलावली होती. यामध्ये ओलींनी भारताबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून चर्चा झाली. तसेच इतर अनेक विषय चर्चिले गेले.