औरंगाबाद- भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्या वक्तव्याचा निषेध करत आज सकाळी 11 वाजता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी क्रांतिचौकात जोडेमारो आंदोलन केले.
भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांची काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना जीभ घसरली होती. पडळकर यांच्या वक्तव्याचा आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस व राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने क्रांतिचौकात निषेध करण्यात आला. या वेळी पडळकर यांच्या प्रतिमेला कार्यकर्त्यांनी जोडे मारत पडळकर हाय-हायच्या घोषणा दिल्या.
पडळकर यांनी माफी मागावी, अन्यथा त्यांना औरंगाबादेत फिरू देणार नाही, असा इशारा युवक शहर अध्यक्ष दत्ता भांगे यांनी दिला आहे. तर बेताल वक्तव्य करणाऱ्या पडळकर यांनी त्वरित आमदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष मेहराज पटेल यांनी केले आहे. या वेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
मुखवटा घालून उठाबशा
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने गोपीचंद पडळकर यांचा मुखवटा लावून आणि गळ्यात मी गधा आहे, असे फलक लावून शरद पवार यांच्या बद्दलचे माझे वक्तव्य चुकले, मला माफ करा म्हणत उठाबशा मारल्या. दरम्यान, आंदोलनाला पोलीस परवानगी घेतली नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे.