नाशिक :रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप होत आहे. त्यामुळे नाशिक महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव यांच्या पुढाकाराने मायलन कंपनीशी थेट संपर्क करून 20 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन मिळवण्यात यश मिळाले आहे. पहिल्या टप्यात 24 तासांत 5 हजार इंजेक्शनचा पुरवठा होणार आहे.
20 हजार रेमडेसिवीर मिळणार
नाशिक जिल्ह्यात गेल्या आठ-दहा दिवसांपासून रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. रेमडेसिवीर मिळावे ह्यासाठी नातेवाईकांना मेडिकल स्टोअर बाहेर ऊन्हातान्हात तासन् तास रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यासोबतच इंजेक्शन मिळत नाही म्हणून 10 एप्रिलला संताप व्यक्त करत नातेवाइकांनी रस्त्यावर बसून आंदोलन केले. यानंतर महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव यांच्या पुढाकाराने थेट मायलन कंपनीशी संपर्क साधण्यात आला. त्यानुसार, नाशिक शहरासाठी 20 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात यश मिळवले आहे. येत्या 24 तासांत पहिल्या टप्यात 5 हजार इंजेक्शन महानगर पालिकेला उपलब्ध होणार आहे.