नाशिक :कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने लावण्यात आलेल्या कडक निर्बंधांच्या काळात शेतकऱ्यांनी पिकवलेला शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहचविण्यासाठी कृषी विभागामार्फत नियोजन करण्यात येत आहे. तसेच कृषी विभागाच्या योजनांमध्ये 30 टक्के प्राधान्य माहिला लाभार्थ्यांना देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिली आहे.
कृषीमंत्री दादाजी भुसे यावेळी म्हणाले की, येणाऱ्या खरीप हंगामात जिल्ह्यातील महत्वाच्या पिकांची उत्पादकता वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. यासाठी ‘एक गाव एक वाण’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष बांधावर खते व बियाणांचे वाटप करण्याच्या मोहिमेला गेल्या वर्षी चांगला प्रतिसाद मिळाला असल्याने शेतकऱ्यांना बांधावर खतांचे वाटप करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. कृषी योजनांमध्ये महिलांनी सहभाग घेतल्यास त्याचा अधिक फायदा होतो, त्याअनुषंगाने महिलांना कृषीविषयक आधुनिक प्रशिक्षण देण्यात येवून कृषी योजनांमध्ये 30 टक्के महिलांना प्राधान्य देण्यात सोबतच अनुसुचित जाती व जमातीच्या शेतकऱ्यांना देखील कृषी योजनांचा योग्य लाभ मिळण्यासाठी त्यांच्या आवश्यक माहितीचे संकलन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
खरीप हंगामाच्या दृष्टिने करण्यात येणाऱ्या नियोजनांविषयी बोलतांना कृषीमंत्री भुसे म्हणाले, शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी वेळेत पिक कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी नियमित पिककर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शुन्य टक्के दराने कर्ज वाटप करण्यासाठी नियोजन करण्यात येत असून त्यासाठी बँकेच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात येणार आहे. तसेच 10 टक्के नाविन्यपूर्ण पिकांच्या उत्पादन घेण्यासाठी कृषी विभागा नियोजनपूर्वक प्रयत्न करीत आहे. मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतून विकेल ते पिकेल योजना यशस्वीपणे राबविण्यात आली असून या योजनेसदेखील शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यासोबतच कापूस बियांणांची दरवाढ कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. रासायनिक खतांची 10 टक्के बचत करून जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.