हिंगोली- शहराचा विकासाच्या दृष्टिकोनातून कायापालट करणारे हिंगोली नगर पालिकेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांची मुंबई येथे महापालिका सहाय्यक आयुक्तपदी बदली झाली आहे. त्यांच्या जागी वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अचानकपणे पाटील यांची बदली झाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. शहराच्या विकासाठी त्यांचे खूप मोठे योगदान असल्याने, त्यांची बदली रद्द करण्याची मागणी जोर धरत आहे.
मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी हिंगोली नगरपालिकेचा पदभार स्वीकारला तेव्हापासून शहरातील विकास कामांमध्ये गती आलेली आहे. एवढेच नव्हे तर शहरातील नागरिकांना कोणत्याही अडीअडचणी सोडविण्यासाठी पाटील हे समोर येत असत. शिवाय कोरणा सारख्या महाभयंकर काळात रस्त्यावरील एकही व्यक्ती उपाशीपोटी राहू नये, तसेच ज्या कुटुंबाला कामे नाहीत अशा कुटुंबांना अन्नधान्य किटचे वाटप पाटील यांनी केले होते, तर दिव्यांग व्यक्तींना कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून त्यांच्या घरी नेऊन किट पुरविल्या होत्या.
अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने लॉकडाऊनच्या काळामध्ये प्रत्येकाची भूक शमविण्याचे काम रामदास पाटील यांनी केले आहे. मुख्य म्हणजे त्यांच्याकडे तक्रार घेऊन जाणाऱ्या प्रत्येकाचे त्यांनी तक्रार निवारण केले. कोरोनाचे संकट सुरू होताच, पाटील यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून दिवस रात्र एक करत सर्व शहर स्वच्छ करून, रस्ते धुवून काढले आणि शहरातील गल्लीबोळात फवारणी केली. त्यानी केलेल्या विकास कामामुळे शहराचा एवढा कायापालट झाला आहे. नगरपालिका ही एवढी कामे करत असते हे त्यानीच दाखवून दिले आहे. शहराच्या अवती भवती झाडाखाली बसून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी पाटील यांनी अभ्यासिका केंद्र सुरू केले. आज या अभ्यासिका केंद्रामध्ये जवळपास 300 ते 400 विद्यार्थी रोज अभ्यास करण्यासाठी येतात.
तसेच शहरातील अतिक्रमण हटवून त्या ठिकाणी खडा पहारा देत रातोरात सिमेंट रस्तेही बनविले आहेत. त्यामुळे भविष्यात हिंगोली शहरात ये- जा करण्यासाठी कायमचा त्रास हा कमी होण्यास मदत होणार आहे. स्वच्छतेच्या बाबतीत हिंगोली नगरपालिकेला पाटील यांनी पारितोषिकही मिळवून दिलेले आहे. अशा कर्तव्यदक्ष अधिकार्याची बदली झाल्यामुळे नागरिकांना खरोखरच धक्का बसला आहे. आता त्यांच्या जागी येणारे मुख्यधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांनी शहरातील अपूर्ण राहिलेली विकास कामे, तसेच रस्त्यावर असलेले अतिक्रमण हटविण्याचे आवाहन आहे.
मात्र पाटील यांच्या कामकाजाने सर्वसामान्य व गोर गरीब आनंदी होते. परंतु त्यांचे धडाकेबाज काम मोजक्याच लोकांना आवडत नसल्याने, त्यांच्या बदलीसाठी खूप प्रयत्न होत होते. मात्र बदली झाल्यामुळे शहरवासियांना चांगलाच धक्का बसला आहे. मात्र त्यांच्या कामाचा ठसा हा हिंगोलीकरांच्या कायम लक्षात राहणार हे ही तेवढेच खरे.