मुंबई -देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरात कोरोना संक्रमित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासकीय स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न सुरू असताना मुंबई शहरात लॉकडाऊनचे निर्बंध लादण्यात आलेले आहेत. मुंबई शहरात कंटेनमेंट म्हणून सील करण्यात आलेल्या इमारतीमध्ये कोरोना नियमांचे पालन करता यावे व तेथील नागरिकांना दैनंदिन गरजेच्या वस्तू मिळाव्यात म्हणून मुंबई पोलिसांकडून नागरिकांमधूनच विशेष पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येत आहे.
सामाजिक कार्यातील नागरिकांची होते निवड -
मुंबई शहरातील विविध 94 पोलीस ठाण्यांमधील परिसरामध्ये सामाजिक कार्यात सतर्क असलेल्या एकूण 1100 नागरिकांची यासाठी निवड करण्यात आलेली आहे. या नागरिकांना मुंबई पोलिस खात्याकडून कलम 21 (1) (2) B महाराष्ट्र पोलीस कायदा 1951नुसार विशेष अधिकार देण्यात येणार आहेत. कोरोना संक्रमणाच्या या संकटांमध्ये लॉकडाऊनचे निर्बंध लादण्यात आल्या नंतर त्यांचे काटेकोरपणे पालन होत, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याबरोबरच कोरोना संक्रमणामुळे सील करण्यात आलेल्या इमारतीमधील नागरिकांना योग्य त्या सुविधा मिळाव्यात यासाठी हे विशेष पोलीस अधिकारी काम करणार आहेत.
नेमण्यात आलेल्या विशेष पोलीस अधिकाऱ्यांकडून त्यांना देण्यात आलेल्या विशेष अधिकारांचा गैरवापर होऊ नये, यासाठी अशा नागरिकांची पार्श्वभूमी ही तपासली जाऊनच त्यांना विशेष पोलीस अधिकाऱ्याचा दर्जा देण्यात येत असल्याचा मुंबई पोलीस खात्याकडून स्पष्ट करण्यात आलेला आहे. मुंबई शहरामध्ये कंटेनमेंट झोन म्हणून सील करण्यात आलेल्या इमारतींच्या संदर्भात लक्ष ठेवण्यासाठी मुंबई पोलीस खात्याकडून 8000 पोलीस व होमगार्ड नेमण्यात आलेले आहेत. ज्या इमारतीमध्ये 5पेक्षा अधिक कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आलेले आहेत, अशा इमारती महानगरपालिकेकडून सील करण्यात आलेल्या आहेत. मात्र या इमारतीतील नागरिकांच्या येण्या-जाण्यावर लक्ष ठेवण्यासाठी सदरचे मनुष्यबळ वापरले जात आहे.