महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर पालिकेला जाग, मुख्यालयातील दवाखाना होणार अद्ययावत - Mumbai mnc hospital upgradation

पालिका मुख्यालयातील दवाखाना आता अद्ययावत होणार असून व्हेंटिलेटर, ऑक्सिजन सुविधेसह दोन रुग्णवाहिका तैनात असणार आहेत. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या मागणीनंतर पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी हा निर्णय घेतला आहे.

Mumbai mnc
Mumbai mnc

By

Published : Aug 1, 2020, 10:21 PM IST

मुंबई- मुंबई महापालिका विरोधी पक्ष नेत्यांच्या कार्यालयातील एका कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर पालिका प्रशासनाला जाग आली आहे. पालिका मुख्यालयातील दवाखाना आता अद्ययावत होणार असून व्हेंटिलेटर, ऑक्सिजन सुविधेसह दोन रुग्णवाहिका तैनात असणार आहेत. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या मागणीनंतर पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी हा निर्णय घेतला आहे.

पालिका मुख्यालयात विरोधी पक्ष नेत्यांच्या कार्यालयात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याचे बुधवारी (29 जुलैला) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. संबंधित कर्मचाऱ्यास श्वास घेण्यास त्रास होत होता. आपत्कालीन विभागात माहिती देऊनही अर्ध्या तासाहून जास्त वेळाने रुग्णवाहिका आली. यानंतर त्याला पालिकेच्या मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र सायंकाळी त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

या पार्श्वभूमीवर मुख्यालयात असणारा दवाखाना अद्ययावत करावा अशी मागणी करण्यात आली होती. यानुसार पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली. यावेळी तातडीने सुविधा निर्माण करण्याचे आदेश आयुक्तांनी वेलरासू यांना दिल्याचे यशवंत जाधव यांनी सांगितले.

पालिका मुख्यालयात महापौरांसह पालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, विविध खात्यांचे प्रमुख, वैधानिक समित्यांचे अध्यक्ष, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते यांची कार्यालये आहेत. मुख्यालयात पालिका सभागृह व विविध समित्यांच्या बैठका होतात. त्यामुळे मुख्यालयात अधिकारी आणि नगरसेवकांचा मोठा वावर असतो. दररोज हजारो कर्मचारी-नागरिक कार्यालयात येतात. मात्र मुख्यालयातील दवाखान्यात सध्या दोनच डॉक्टर असून यात एक आयुर्वेदिक व एक अ‍ॅलोपॅथी डॉक्टर आहे. येथे कर्मचार्‍यांच्या किरकोळ आजारावर उपचार केले जातात. त्यामुळे, या ठिकाणी अद्ययावत सुविधा सुरू करावी, अशी मागणी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details