मुंबई- मुंबई महानगर पालिकेने गंभीर रुग्णांच्या उपचारासाठी याआधीच 15 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन हैदराबादमधील हेट्रो कंपनीकडून खरेदी केले आहेत. पण सध्या या इंजेक्शनचा तुडवडा आहे. पुरवठा कमी आहे, तर रेमडेसिवीरचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर पालिका रुग्णालयात या इंजेक्शनचा येत्या काळात तुडवडा भासू नये यासाठी आणखी 15 हजार इंजेक्शन खरेदी केले जाणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.
गंभीर रुग्णांवर रेमडेसिवीर हे स्वाईन फ्ल्यूवरील इंजेक्शन प्रभावी ठरत आहे. त्यामुळे आता डॉक्टरांकडून या इंजेक्शनचा वापर वाढला आहे. एकूणच इंजेक्शनची मागणी वाढली आहे. पण त्या तुलनेत पुरवठा नसल्याने मुंबईच नव्हे तर देशभर रेमडेसिवीरचा तुडवडा आहे. खासगी रुग्णालयात याचा कृत्रिम तुटवडा निर्माण करत दामदुप्पटीने इंजेक्शन विकत असल्याचाही आरोप होत आहे.