मुंबई - कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने मुंबई महापालिकेचे भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय म्हणजेच राणीची बाग गेले अडीच महिने बंद आहे. याचा परिणाम राणीच्या बागेच्या महासुलावर झाला आहे. लॉकडाऊन असले तरी राणीच्या बागेतील प्राण्यांची योग्य काळजी घेतली जात असून त्यावर गेल्या तीन महिन्यांत तब्बल सव्वा कोटींचा खर्च करण्यात आला आहे.
राणीच्या बागेतील प्राण्यांच्या देखभालीवर तीन महिन्यात सव्वा कोटी खर्च, महसूल बंद
कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने मुंबई महापालिकेचे भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय म्हणजेच राणीची बाग गेले अडीच महिने बंद आहे. याचा परिणाम राणीच्या बागेच्या महासुलावर झाला आहे. प्रतिदिवस दीड लाखांचा महसूल बुडत आहे.
मुंबईत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने राणीच्या बागेत पर्यटकांना येण्यास बंदी घालण्यात आली आहे. राणीच्या बागेत २०१७ मध्ये पेंग्विन आणल्यापासून येणार्या पर्यटकांची संख्या हजारोंनी वाढली होती. त्यामुळे राणीच्या बागेचा महसूलही मोठ्या प्रमाणात वाढला. राणीच्या बागेला पर्यटकांमुळे दररोज १५ ते २० हजारांपर्यंत सुरुवातीला मिळणारे उत्पन्न एक लाखांपासून ते सहा लाखांपर्यंत वाढले होते. सध्या सरासरी उत्पन्न प्रतिदिवस दीड लाख आणि महिना सरासरी ४५ लाखांवर गेले आहे. मात्र कोरोनामुळे गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून राणीची बाग पर्यटकांसाठी बंद असल्याने प्रतिदिवस दीड लाखांचा महसूल बुडत आहे.
लॉकडाऊनच्या आधी राणीच्या बागेत बिबट्या, तरस आदी प्राणी नव्याने आणण्यात आले होते. तसेच, या बागेत वाघ, पेंग्विन, अस्वल, गेंडा तसेच, वेगवेगळ्या जातींचे पक्षी आधीपासूनच आहेत. या सर्व प्राणी आणि पक्षांची खाण्यापासून औषधांपर्यंतची काळजी घेतली जात आहे. कंत्राटदारांच्या माध्यमातून येथील जनावरांना खाद्यपदार्थाचा पुरवठा केला जात आहे. कोरोनाचा धोका राणी बागेतील प्राण्यांना होऊ नये यासाठी सॅनिटायजींग, जंतूनाशक फवारणी, स्वच्छता राखली जात आहे. यासाठी मागील तीन महिन्यांत सव्वा कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्याने दिली.
डिसेंबर अखेरपर्यंत गुजरातहून सिंहांची जोडी -
पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध जातींचे प्राणी राणीच्या बागेत आणले जात आहेत. गुजरात प्राणी संग्रहालायास राणीच्या बागेतील दोन झेब्रा देऊन त्या बदल्यात तेथून सिंहांची जोडी बागेत आणली जाणार आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत ही सिंहांची जोडी राणीच्या बागेत दाखल होईल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.