मुंबई- कोरोना प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे बेरोजगारीची समस्या उद्भवली असताना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांतर्गत विविध कामे करणाऱ्या कंत्राटदारांकडील 17 हजार पदांच्या भरतीकरीता कौशल्य विकास विभागामार्फत पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
मेळाव्यात पहिल्या टप्प्यात 2 हजार 923 पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी ठाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाने 6 ते 8 जुलै 2020 या कालावधीत, तर मुंबई उपनगर आणि मुंबई शहर या कार्यालयांनी 8 ते 12 जुलै 2020 या कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 06 वाजता कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे.
सद्यस्थितीत कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे मुंबई व राज्यातील इतर जिल्ह्यातून बरेचशे कुशल, अर्धकुशल, अकुशल कामगार स्थलांतरीत झाले आहेत. परंतु राज्याच्या विकासासाठी राज्यातील पायाभूत प्रकल्प सुरू राहण्याची आवश्यकता आहे. या अनुषंगाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांचे अंतर्गत कामे करणाऱ्या कंत्राटदार यांच्याकडे सुमारे 17 हजार गवंडी, सुतारकाम, फिटर (स्टील फिक्सिंग करणारे), फिटर (बार बेंडिंग व फिक्सिंग करणारे), वेल्डर, इलेक्ट्रिशियन व वायरमन अशा शैक्षणिक पात्रतेच्या कुशल आणि अकुशल कामगार (श्रमिक) मनुष्यबळाची आवश्यकता आहे. यापैकी ऑनलाइन मेळाव्याच्या पहिल्या टप्प्यात 2 हजार 923 पदे भरली जाणार आहेत. ही विविध प्रकारची रिक्तपदे विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in वेबपोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
ही रिक्तपदे मुख्यत: मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे जिल्ह्यातील आहेत. एमएमआरडीएची विविध कामे करणाऱ्या कंत्राटदारांकडे एकूण सुमारे 17 हजार रिक्तपदे आहेत. हे कंत्राटदार त्यांच्याकडील रिक्तपदे टप्याटप्प्याने कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या वेबपोर्टलवर अधिसूचित करत आहेत. त्यांच्याकडील रिक्तपदे जसजशी अधिसूचित करण्यात येतील त्याप्रमाणे भविष्यात वेळोवेळी अशा प्रकारचे ऑनलाइन रोजगार मेळावे पुन्हा आयोजित करून ही पदभरती करण्यात येईल.
रिक्तपदे भरण्याकरिता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या संकटकाळात राज्यातील बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने पुढाकार घेतला आहे. सध्याचा लॉकडाऊनचा कालावधी बघता प्रत्यक्ष रोजगार मेळावे आयोजन करणे शक्य व योग्य नसल्याने या विभागामार्फत आता ऑनलाईन रोजगार मेळावे आयोजित करण्यात येत आहेत.