गडचिरोली -जिल्ह्यात कोरोना उपचारासाठी एकही खासगी रुग्णालय नसताना जिल्ह्यातील सर्व कोविड रुग्णांना आवश्यक आरोग्य सेवा देऊन, जिल्हा सामान्य रुग्णालयाने जिल्ह्याची गरज पूर्ण केली आहे, असे प्रतिपादन राज्याचे आपत्ती व्यवस्थापन तथा मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोली येथे केले. कोरोनाबाबत सद्यस्थिती व विविध उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी गडचिरोली येथे आले होते.
मंत्री वडेट्टीवार यांनी जिल्ह्यातील ऑक्सिजन, रेमडेसिवीर, बेड्सची उपलब्धता यावर माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील रुग्णांना आवश्यक मदत देण्यासाठी सहकार्य करा व रुग्णांची प्रोटोकॉलनुसार तपासणी करून चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी पुढाकार घ्या, असे निर्देश उपस्थित आरोग्य अधिकाऱ्यांना दिले. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा टीम अतिशय चांगले कार्य करत असल्याचे मंत्र्यांनी यावेळी उद्गार काढले.
बैठकीमध्ये मंत्री वडेट्टीवार यांना कोविड परिस्थितीबाबतची माहिती डॉ.अनिल रूडे यांनी दिली. यावेळी नागपूर पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजीत वंजारी, जिल्हापरिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, उपाध्यक्ष मनोहर पोरेड्डी पाटील, जिल्हा परिषद सदस्य ॲड. हरीभाऊ मेश्राम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रूडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सोळंकी, डॉ. मुकूंद ढबाले उपस्थित होते.
वडेट्टीवार यांनी कोरोना वार्डाबाहेर जाऊन त्याठिकाणीची पाहणी केली. यावेळी घेतलेल्या बैठकीत त्यांनी कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी रूपरेषा तयार करण्याच्या सूचना दिल्या. जिल्ह्यातील पॉझिटिव्हीटी रेट इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बरा आहे. मात्र, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या नियंत्रणात येणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील डबलींग रेटही खूप असून आपल्याला संसर्ग साखळी तोडण्यासाठी रुग्णांच्या संपर्कातील इतरांचा शोध घेणे पण आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. लसीकरणाबाबत बोलताना ते म्हणाले की, जरी लसींचा पुरवठा कमी असला तरी जिल्ह्यातील लसीकरणाची टक्केवारी राज्याच्या तुलनेत कमी आहे. आता लोकांना लसीकरणाची गरज लक्षात आली आहे. लसींचा पुरवठा पूर्ववत झाल्यावर जिल्ह्यातील लसीकरण वाढविणे गरजेचे आहे.