मुंबई - मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यानंतर मंत्री अशोक चव्हाण आणि आता राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंडे यांच्या स्वीय सहाय्यकासह अन्य कर्मचारीही कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारच्या बैठकीत मुंडे सहभागी झाले होते. मुंडे यांना कोरोनाची लागण नेमकी कुठे झाली हे अजून स्पष्ट झालेले नाही. संंबंधित वृत्ताला पहाटे पाच वाजता बीड जिल्हाधिकारी यांनी दुजोरा दिला आहे. मुंडे सध्या मुंबईत असून, रुग्णालयात उपचार घेत आहेत.
याआधी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाली होती. या दोन्ही मंत्र्यांनी करोनावर मात केली. मुंडे यांनी सोमवारी अंबाजोगाईत कोविड १९ प्रयोगशाळेचे उद्घाटन देखील केले होते. यावेळी अनेकजण उपस्थित होते. तसेच परळीत जगतकर गल्लीतील एक महिला कोरोना पॉझिटिव्ह औरंगाबादेत 5 जून रोजी आढळून आली होती. त्यावेळी तिच्या कुटुंबीयांच्या संपर्कात मुंडे देखील आले होते. मुंडे यांचा समावेश हाय-रिस्क गटात न करता लो-रिस्क गटात करण्यात आला होता. त्यामुळे यापूर्वी त्यांचे स्वॅब घेण्यात आले नव्हते.