जळगाव :शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात मनपा प्रशासनाकडून कोविड केअर सेंटर आणि विलगीकरण कक्ष उभारण्यात आला आहे. येथे रुग्णांना मिळणारी सोयसुविधा योग्यप्रकारे आहे की नाही याची महापौरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाहणी केली. यावेळी त्याठिकाणी असलेल्या काही अडचणी दूर करण्यासाठी पाठपुरावा करून तातडीने सोयीसुविधा पुरविण्यात येतील असे महापौर भारती सोनवणे यांनी सांगितले.
मनपाच्या कोविड केअर सेंटर आणि विलगीकरण कक्षाबाबत असलेल्या अडचणींची प्रत्यक्षात पाहणी करून त्या दूर व्हाव्या यासाठी बुधवारी महापौर भारती सोनवणे यांनी सर्व गटनेत्यांची बैठक घेतली होती. गुरुवारी सकाळी १० वाजताच महापौर भारती सोनवणे यांच्यासह नगरसेवक कैलास सोनवणे, बंटी जोशी, उज्ज्वला बेंडाळे, चेतन सनकत, अमर जैन, ज्योती चव्हाण, गायत्री राणे, सुरेखा तायडे आदींनी कोविड केअर सेंटर गाठले. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय आणि आय.टी.आय.च्या वसतीगृहात सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर व विलगीकरण कक्षाला महापौरांसह सर्वांनी भेट दिली. त्याठिकाणी असलेले डॉक्टर, कर्मचारी, मनपा समन्वयक तसेच रुग्णांशी त्यांनी चर्चा केली. सर्वांच्या समस्या ऐकून घेत त्या तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन महापौरांनी दिले.
रुग्णांनी केल्या तक्रारी
महापौरांसह सर्वांनी प्रत्येक कक्षातील रुग्णांशी संवाद साधला असता डॉक्टर वेळेवर येत नाही, लहान मुलांना औषधी मिळत नाही. अहवाल यायला उशीर होतो, डॉक्टर, नर्स संख्या कमी आहे. चहासोबत बिस्कीट मिळत नाही, काढा येत नाही. वयस्कर व्यक्तींना खालील माळ्यावर हलवावे अशा तक्रारी त्यांनी मांडल्या. महापौर भारती सोनवणे यांनी याबाबत संबंधितांना सूचना देत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.