मुंबई : महाराष्ट्र राज्यसह संपूर्ण देशामध्ये कोरोनाने थैमान घातले असून त्याचा परिणाम राज्यातील दूध उत्पादक शेतकर्यांवर पहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून खासगी व सहकारी दुग्धसंस्थांनी शेतकर्यांकडून होणार्या दुधाची खरेदी कमी केली होती तर काही ठिकाणी दूध खरेदी बंद झाली होती. अशा परस्थितीमधे राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकर्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे.
१० लाख लिटर दुधाचा खप होत नसल्याने हे दूध अतिरिक्त ठरले होते. यामुळेच शेतकर्यांना दुधाला चांगला भाव मिळत नसून खरेदी होत नाही. परंतु राज्य सरकार हे अतिरिक्त दूध २५ रुपये लिटर या दराने खरेदी करून भुकटी करण्यासाठी 190 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनात यासंबंधीचा पुरवणी मागण्या मंजूर केल्यानंतर राज्य सरकारने शासन आदेश काढून निधी वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे.
३१ मार्च रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर दोन महिने ही खरेदी सुरू होती. 6.4.2020 ते 31.5.2020 या दोन महिन्याच्या कालावधीत खरेदी केलेल्या ह्या अतिरिक्त दुधाची भुकटी करून ती साठवली होती नंतर त्या भुकटीची ऑनलाइन विक्री केली जाणार आहे. राज्य दूध महासंघाच्या माध्यमातून ही योजना राबवण्यात येणार असून यासाठी साधारणपणे सहा कोटी लिटर दूध 190 कोटी रुपये 30 लाख खर्च करून भुकटीत रूपांतरित करण्यात येणार होते.
या योजनेसाठी यापूर्वीच राज्य सरकारने आकस्मिक निधीतून 100 कोटी रुपये उपलब्ध करून दिले असून आता नव्या शासन आदेशामध्ये पन्नास लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
राज्यातील बहुतांश शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून छोट्या-मोठ्या प्रमाणात दूध व्यवसाय करत आहेत. परंतु मागील काही दिवसात कोरोनामुळे दूध उत्पादक शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले. दूध खराब होणे, विक्री होत नसल्याने दूध फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. सरकारच्या ह्या निर्णयामुळे राज्यातील दूध उत्पादक शेतकर्यांना काहीसा दिलासा मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.