चंद्रपूर- जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यात कोरोना रुग्ण असताना चिमूर तालुका कोरोणामुक्त होता. मात्र 5 जुलैला नागपूर येथील तुरुंगातून आलेल्या 35 वर्षीय युवकाचा स्वॅब नमुना कोरोना पॉझिटिव्ह आल्याने प्रशासण व नागरिकांची झोप उडाली आहे. त्यामुळे चिमूर नगर परीषदेने व्यापारी मंडळाच्या सहकार्याने 6 जुलै ते 8 जुलै, असे तीन दिवस शहरात लॉकडॉऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.
चिमूर तालुक्यातील सोनेगाव (वन ) येथील युवक नागपूर कारागृहातून चिमूर येथे 1 जुलैला मागासवर्गीय मुलींच्या वसतीगृहात असलेल्या संस्थागत विलगीकरण केंद्रात दाखल झाला होता. त्याला 2 जुलैला उपजिल्हा रुग्णालयातील अलगीकरण केंद्रात ठेऊन 3 जुलैला त्याच्या स्वॅबचा नमूना तपासणी करीता पाठविण्यात आला होता. त्याचा कोरोना तपासणी अहवाल काल (5 जुलै) पॉझिटिव्ह आला. त्यामुळे प्रशासण खळबळून जागे होऊन अॅक्शन मोडमध्ये आले आहे, सदर कोरोना रुग्णाची सविस्तर माहिती घेण्यात आली.
रुग्णाने नागपूरवरून ऑटोने उमरेडला, उमरेडवरून भिसीला ट्रकने, भिसीवरून चिमूर येथील चारचाकी वाहनाने पोलीस स्टेशन आणि तेथून मेहुण्यासोबत संस्थागत विलगीकरण केंद्रात असा प्रवास केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर कोरोना रुग्णाच्या अती संपर्कात आलेल्या 4 व्यक्तींची ओळख पटली असून त्यापैकी 3 व्यक्तींना स्वॅब तपासणी करीता अलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे. चौथा व्यक्ती चंद्रपूरला कामा निमित्त बाहेर असून सांयकाळपर्यंत ती व्यक्तीही अलगीकरण केंद्रात दाखल होणार आहे.