रत्नागिरी- भक्षाचा पाठलाग करताना विहीरीत पडून बिबटयाचा मृत्यू झाल्याची घटना चिपळूण तालुक्यातील ढोक्रवली येथे गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे. शिकारीसाठी लोकवस्तीमध्ये आल्याने बिबटयांसह अन्य वन्यप्राण्यांना जीवाला मुकावे लागते. अशाप्रकारे वन्यप्राण्यांच्या मृत्यूंचे प्रमाण तालुक्यात वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
शिकारीच्या शोधत विहीरीत पडून बिबट्याचा मृत्यू, चिपळूण तालुक्यातील ढोक्रवलीतील घटना - Leapord died news ratnagiri
चिपळूण तालुक्यातील ढोक्रवली येथे भक्षाचा पाठलाग करताना विहीरीत पडून बिबटयाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
ढोक्रवली गावातील सुतारवाडी परिसरातील मनोहर राजाराम महाडीक यांच्या मालकीच्या विहीरीवर गुरूवारी सकाळी मोटर सुरू करण्यासाठी एक व्यक्ती गेला. तेव्हा त्याला एक बिबटया पाण्यावर तरंगताना दिसला. याबाबत त्यांनी सावर्डे येथील वनविभागाला कळवल्यानंतर परिक्षेत्र वनाधिकारी सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल राजेश्री किर, वनसंरक्षक रानबा बंबर्गेकर यानी घटनास्थळी जाऊन मृत बिबटयाला ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढले.
त्यानंतर त्या बिबट्याला पिंपळी येथील वनविभागाच्या रोपवाटीकेत आणण्यात आले. तेथे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एस.जी. नरळे यांनी बिबट्याचे शवविच्छेदन केले. साधारण साडेतीन वर्षाचा आणि पूर्ण वाढ झालेला नर जातीचा हा मृत बिबटया होता. अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.