मुंबई -प्रत्येक पालकाला आपला मुलगा, मुलगी इंग्रजी शाळांमध्ये शिकला पाहिजे अशी इच्छा असते. ही इच्छा मुंबई महापालिका पूर्ण करणार आहे. पालिका सुरू करत असलेल्या सीबीएससी, आयसीएससीच्या शाळांमध्ये आता बालवाडी वर्ग सुरू केले जाणार आहेत. अशा शाळांमध्ये बालवाडीत प्रवेश घेतल्यावर शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत विद्यार्थ्याला पुन्हा प्रवेश घेण्याची गरज भासणार नाही तसेच अशा विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणही मिळणार आहे.
इंग्रजीकडे पालकांचा कल -
स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून मुंबई महापालिका नागरिकांना सेवा सुविधा देते. त्याच प्रमाणे आरोग्य आणि शैक्षणिक सुविधा पालिकेकडून दिली जाते. महापालिका ८ भाषेतून शिक्षण देत असून त्याचा लाभ सुमारे तीन लाख विद्यार्थी घेत आहेत. गेल्या काही वर्षात पालकांचा कल इंग्रजी माध्यमांच्या शाळेकडे वाढला आहे. त्यासाठी पालिकेने इंग्रजी माध्यमांच्या पब्लिक शाळा सुरू करून मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले जात आहे. पालिकेने आपल्या इतर भाषिक शाळा बंद करून इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केल्या आहेत. पालिकेने सुरू केलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
बालवाडी सुरू होणार -
सध्या पालकांचा कल सीबीएससी आणि आयसीएससी कडे वाढला आणि त्यांनी आपल्या पाल्यांना या बोर्डाच्या शाळांमध्ये शिक्षण द्यायला प्राधान्य दिले आहे. त्यानुसार पालिकेनेही गेल्या वर्षी पहिली ते सहावी पर्यंतच्या सीबीएससी,आणि आयसीएससीच्या प्रायोगिक तत्वावर शाळा सुरू केल्या. या शाळांमध्ये विद्यार्थी यावेत म्हणून मागील वर्षी वुलन मिल स्कूल आणि पूनम नगर स्कूलमध्ये नर्सरी वर्ग सुरू करण्याची परवानगी मागण्यात आली होती. आता पालिका सीबीएससी,आणि आयसीएससीच्या दहा शाळा सुरू करत आहे. या सर्व शाळांमध्ये बालवाडी बवर्ग सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे बालवाडीत ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्याला शालेय शिक्षण संपेपर्यंत एकाच शाळेत शिक्षण घेता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचे दर्जेदार शिक्षणही मिळणार आहे.