गोंदिया- नोकरीत त्रास होवू नये म्हणून चाईल्ड क्रुअॅल्टी गुन्ह्यातून सुटका करण्यासाठी पोलीस हवालदाराकडून 35 हजारांची लाच मागून ती पोलीस उपनिरीक्षकाच्या सहाय्याने स्वीकारणाऱ्या गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ठाणेदाराला काल (शुक्रवारी) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
ठाणेदार प्रदीप अतुलकर (वय 40) आणि पोलीस उपनिरीक्षक उमेश ज्योतिराम गुटाळ (वय 31) असे अटक केलेल्या पोलिसांची नावे आहेत. गोंदिया पोलीस दलातील पोलीस हवालदाराविरोधात गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात चाईल्ड क्रुअॅल्टी कायद्यान्वये 30 मे रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती. हा गुन्हा अदखलपात्र होता.
या गुन्ह्यातील आरोपी पोलीस हवालदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यापूर्वी ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रदीप अतुलकर यांनी तक्रारदार पोलीस हवालदाराला ठाण्यात बोलावले. दरम्यान त्याला गुन्हा दाखल झाल्यास पुढे नोकरीत अडचण निर्माण होईल. अर्जदाराशी समझोता करण्याकरता 35 हजार रुपये लागतील व ते पोलीस उपनिरीक्षक उमेश गुटाळ यांच्याकडे द्या असे सांगीतले. मात्र, तक्रारदार पोलीस हवालदाराला लाच देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने त्याने 18 जूनला गोंदिया येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार नोंदविली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक रमाकांत कोकाटे यांनी काल सापळा रचला व पोलीस उपनिरीक्षक उमेश गुटाळ हे पोलीस हवालदाराकडून ठाणेदार प्रदीप अतुलकर यांच्या करिता 35 हजार रुपयेची लाच स्वीकारताना दोघांना रंगेहाथ पकडले.