'औद्योगिक कामगार ब्यूरो पोर्टल कार्यान्वित होणार जूनच्या शेवटच्या आठवड्यात'
कोविडमुळे राज्यातील अनेक कंपन्यातून कामगार परराज्यात गेले आहेत. त्यामुळे अनेक उद्योगांना कामगारांची समस्या भेडसावत आहे. मात्र, यानिमित्ताने स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीची संधी चालून आली आहे. त्यासाठी औद्योगिक कामगार ब्युरोची स्थापना करण्यात आली.
मुंबई - सर्वाधिक स्थलांतर झालेल्या महाराष्ट्र राज्यावर भविष्यात अशी वेळ येऊ नये, यासाठी उद्योगांना कुशल, अकुशल तसेच अर्धकुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी उद्योग विभागाच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आलेल्या औद्योगिक कामगार ब्युरोची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. गुरुवारी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यासंबंधी विकसित करण्यात आलेल्या वेबपोर्टलचा आढावा घेतला. दरम्यान, जून महिन्याच्या अंतिम आठवड्यात लेबर ब्यूरो कार्यान्वित होईल, अशी माहिती देसाई यांनी दिली.
कोविडमुळे राज्यातील अनेक कंपन्यातून कामगार परराज्यात गेले आहेत. त्यामुळे अनेक उद्योगांना कामगाराची समस्या भेडसावत आहे. मात्र, यानिमित्ताने स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीची संधी चालून आली आहे. त्यासाठी औद्योगिक कामगार ब्युरोची स्थापना करण्यात आली. याद्वारे तरुणांची कुशल, अकुशल अशी वर्गवारी करून नोंदणी केली जाणार आहे. एका वेबपोर्टलद्वारे ही नोंदणी केली जाईल. इच्छुकांना अगदी सहज सोप्या पद्धतीने नोंदणी करता यावी, याची काळजी घेतली जात आहे.
यासंदर्भातील वेबिनारमध्ये लक्ष्मीकांत देशमुख, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू, कुलपती आदींनी सहभाग नोंदविला. या उपक्रमात उद्योग विभागातर्फे काम करण्याची तयारी विद्यापीठाने दर्शविली आहे. नोकरी देणारे आणि नोकरी मागणारे यांचा या ब्यूरोद्वारे समन्वय साधला जाणार आहे. जून महिन्याच्या अंतिम आठवड्यात हे पोर्टल कार्यान्वयित केले जाणार आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगणारी, उद्योग विभागाचे सचिव वेणुगोपाल रेड्डी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अन्बलगन आदी उपस्थित होते.