पुणे- आषाढी वारीची परंपरा चालू ठेवण्यासाठी या वर्षी प्रातिनिधिक स्वरुपात काही संतांच्या पादुका, ज्या परंपरेने विठ्ठल रुक्मिणी भेटीस जातात त्यांना मर्यादित स्वरुपात आणि केवळ संतांच्या पादुका एसटीद्वारे किंवा वाहनाद्वारे आषाढी एकादशीच्या अगोदरच्या दिवशी (30 जून 2020) दशमीला श्री क्षेत्र पंढरपूर येथे नेण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. यात पुणे जिल्ह्यातील 4 देवस्थानांच्या पालख्या संतांच्या पादुका घेवून परत प्रस्थानाच्या ठिकाणी सुरक्षित येतील याबाबत योग्य ते नियोजन करण्याकरता आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार इन्सिडेंट कमांडरच्या नेमणुका करण्यात आल्या असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.
पुणे जिल्ह्यातून श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत तुकाराम महाराज, श्री संत सोपानदेव महाराज, श्री संत चांगवटेश्वर देवस्थान या चार पालख्या पंढरपुरला जाणार आहेत. त्यासाठी सदर व्यवस्था करण्यात येत आहे. दरवर्षी आषाढी वारीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून मोठया प्रमाणात लाखोंच्या संख्येने भाविक संतांच्या पालखीसोबत पंढरपूर येथे जात असतात. सध्या महाराष्ट्रात मोठया प्रमाणात कोरोना संसर्गाच्या वाढीस आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव सर्वसामान्य नागरिकांना व जनतेला होऊ नये यासाठी पायी-पालखी वारी करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.