मुंबई - एकीकडे कोरोनाचे महाभयंकर संकट असताना मुंबईत आज (मंगळवारी) निसर्ग या चक्रीवादळाचे संकट घोंघावत होते. मात्र, मुंबईत हे वादळ आले नसले तरी त्याचा शहराला फटका बसला आहे. या वादळामुळे 9 ठिकाणी घरांचा काही भाग कोसळला आहे. 196 ठिकाणी झाडे आणि झाडांच्या फांद्या पडल्याच्या घटना घडल्या आहेत. तर 39 ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटनांची नोंद पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडे झाली आहे.
मुंबईत कोरोनाचे संकट असताना निसर्ग चक्रीवादळाचे दुसरे संकट मुंबईवर येऊन ठेपले होते. मंगळवारपासून मुंबईत पावसाची रिपरिप सुरूच होती. मंगळवारी सकाळपासून मुंबईत काही ठिकाणी पावसाने जोर धरला होता. समुद्र किनारी पावसाबरोबर हवेचा जोर जास्त होता. जास्त जोराने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे मुंबईत शहरात 3, पश्चिम उपनगरात 4 आणि पूर्व उपनगरात 2 अशा 9 ठिकाणी घराचा काही भाग कोसळल्याच्या घटना घडल्या. जोरदार वाहणाऱ्या वाऱ्यामुळे शहरात 39, पूर्व उपनगरात 40 तर पश्चिम उपनगरात 38 अशा 196 ठिकाणी झाडे आणि झाडाच्या फांद्या पडल्या. शहरात 19 तर उपनगरात 20 अशा एकूण 39 ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटनांची नोंद झाली.