पाटणा -मी बिहारचा दुसरा लालू प्रसाद, असे वक्तव्य लालू प्रसाद यादवांचे मोठे पुत्र तेज प्रताप यादव यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकांना सुरुवात होण्याआधीच त्यांचा कुटुंबियांशी वाद सुरू आहे. अशात त्यांनी स्वतःला चक्क लालू प्रसादच संबोधले आहे. ते शुक्रवारी जनाबाद येथे आपल्या पक्षाचे उमेदवार चंद्र प्रकाश यांच्या प्रचार सभेत बोलत होते.
बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव सध्या चारा घोटाळा प्रकरणी तुरुंगात आहेत. त्यांची प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे त्यांच्यावर रांची येथील रिम्स रुग्णालयात उपचार सुरू आहे. या निवडणूकांमध्ये लालू प्रसाद यादव राजकारणात सक्रिय नसले तरी त्यांच्या नावावर मतदान मागितले जात आहे. अशात आता त्यांच्या मुलानेच आपण लालू प्रसाद यादव असल्याचे म्हटले.