धुळे - जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यातील मौजे मालकातर येथील स्वस्त धान्य दुकानदार गैरव्यवहार करीत असल्याच्या तक्रारी बऱ्याच दिवसापासून जिल्हा प्रशासनास प्राप्त होत होत्या. या प्रकरणी, पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अचानक छापा टाकला. यावेळी, गहू व तांदळाचा जास्तीचा साठा आढळून आला. या कारवाईत संबंधित स्वस्त धान्य दुकानदार नवलसिंग पाडवी पावरा व बेकायदेशिररित्या स्वत:च्या घरात शासकीय रेशनचे धान्य साठवून ठेवणारा पदम पाडका पावरा व रविंद्र विक्रम पावरा यांच्या विरुध्द जीवनावश्यक वस्तू कायदांतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
शिरपूर तालुक्यातील मौजे मालकातर हे गाव मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवर असल्याने धान्यांचा वाटपाबाबत अनियमितता होत असल्याच्या तक्रारी जिल्हा पुरवठा कार्यालयास प्राप्त झालेल्या होत्या. त्यामुळे सदर भागातील धान्य वाटपावर जिल्हा प्रशासनाचे बारकाईने लक्ष होते. मौजे मालकातर येथील पदम पाडका पावरा यांचे घरामध्ये रेशनचे धान्य साठवून ठेवल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्याअनुषंगाने जिल्हा पुरवठा अधिकारी, रमेश मिसाळ, पुरवठा कार्यालयातील कर्मचारी विवेक घुगे व पुरवठा निरीक्षक शिरपूर, अपर्णा वडुरकर यांच्या पथकाने सदर स्थळी अचानक छापा टाकला. यावेळी तेथे उपस्थित पदम पाडका पावरा याने त्याच्या घरातील धान्यसाठा दाखवला. मात्र, शासकीय गोदामातून देण्यात आलेला धान्यसाठा व प्रत्यक्ष साठा याचा ताळमेळ मिळून आला नाही. पदम पावरा याने रविंद्र विक्रम पावरा याच्या घरामध्ये उर्वरीत धान्य असल्याचे सांगितले आणि पथकाने त्याची मोजदाद केली.