मुंबई- विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे आणि दोनच दिवसांपूर्वी स्वत: भगवती रुग्णालयाला दिलेल्या भेटीनंतर प्रशासकीय यंत्रणांना जाग आली आहे. त्यामुळे सुमारे 2 वर्षापासून बंद असलेला रुग्णालयातील आयसीयू विभाग उद्या (सोमवार) पासून सुरू होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर व मुंबईचे महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी दिलेल्या शब्दामुळे हा विभाग पूर्णपणे कार्यान्वित होणार आहे. यामुळे पश्चिम उपनगरातील गरजू रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
भगवती रुग्णालयात 69 खाटांची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच आयसीयू विभागात 10 बेड व 5 वेंन्टिलेटर्सची सुविधा देण्यात येणार आहे. महापालिकेच्या अभियंता विभागाने योग्य कार्यवाही करून रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. तसेच या विभागासाठी आवश्यक कर्मचारी वर्गाचीसुध्दा व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्व सोपस्कर पूर्ण झाले असून सोमवारी औपचारिकपणे आयसीयू विभाग सुरू होईल.