इस्लामाबाद-पाकिस्तानात 22 मे ला लाहोरवरून कराचीला जाणारे प्रवासी विमान उतरण्याच्या प्रयत्नात असताना धावपट्टीपासून 1 किमी अंतरावर निवासी भागात कोसळले. या विमान अपघातात 97 जणांना मृत्यू झाला. अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी नागरी उड्डाण मंत्रालयाने उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली आहे. या समितीच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
वैमानिक विमान चालवायचे सोडून कोरोनावर गप्पा मारत बसले होते. ही मानवी चूक असून वैमानिकांचा अतिआत्मविश्वास आणि दुर्लक्षपणा अपघातास कारणीभूत ठरल्याचे पाकिस्ताच्या हवाई उड्डाण मंत्र्यांनी संसदेत सांगितले.
कराचीतील जिन्ना इंटरनॅशनल विमानतळावर उतरण्याच्या प्रयत्नात असताना विमान निवासी भागात कोसळले होते. या विमानात 91 प्रवासी आणि 8 कर्मचारी होते. दोन प्रवासी आश्चर्यकारकरित्या या अपघातातून बचावले होते. नागरी उड्डाण मंत्री गुलाम सरावर खान यांनी संसदेत हा विमान अपघाताचा चौकशी अहवाल सादर केला.
वैमानिक आणि एअर ट्रॅफिक कंट्रोल विभागातील कर्मचाऱ्यांनी नियमांचे पालन केले नाही. त्यांच्या चुकीमुळे अपघात घडल्याचे अहवालात म्हटले आहे.
कोरोनावर रंगल्या होत्या गप्पा
दोन्ही वैमानिक प्रवासात कोरोनावर चर्चा करत होते. त्यांचे विमान चालविण्यावर लक्ष नव्हते. त्यांच्या कुटुंबियांना कोरोनाची झळ बसली होती. त्यामुळे या विषयी त्यांच्यात चर्चेचा चालली होती. जेव्हा नियंत्रण कक्षाने विमानाची उंची वाढवण्याची विनंती वैमानिकाला केली तेव्हा त्यांने मी सांभाळून घेईल, असे उत्तर दिले, यातून त्यांचा अतिआत्मविश्वास दिसून येतो, असे खान म्हणाले. जे या अपघाताला जबाबदार आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, तसेच संपूर्ण अहवाल तयार होण्यास वर्षाचा कालावधी लागणार असल्याचे ते म्हणाले.
पीआयएमधील 40 टक्के वैमानिकांकडे बनावट परवाना आहे. त्यांनी कोणतीही परीक्षा दिली नाही. तसेच त्यांना विमान चालविण्याचा चांगला अनुभवही नाही. राजकीय हस्तक्षेपातून त्यांची नेमणूक करण्यात आल्याचे वास्तव नागरी उड्डान मंत्र्यांनी संसदेत सांगितले.