अकोला - पालकमंत्री बच्चू कडू यांनी आज अकोला दौऱ्यावर असताना मूर्तिजापुर तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. शेतकऱ्यांच्या अडचणी आणि समस्या समजून घेतल्या. तसेच तालुक्यातील राजापूर खिनखिनी या गावातील शेतकरी प्रशांत भानुदास साबळे यांच्या शेतात भेट देऊन त्यांनी शेतात बैलाचे कासरे हातात घेवून तिफणने पेरणी देखील केली.
अकोला : पालकमंत्र्यांनी लुटला पेरणीचा आनंद, शेतकऱ्यांशी साधला संवाद
पालकमंत्री बच्चू कडू यांनी आज अकोला दौऱ्यावर असंताना मूर्तिजापुर तालुक्यातील राजापूर खिनखिनी या गावातील शेतकरी प्रशांत भानुदास साबळे यांच्या शेतात भेट देऊन त्यांनी शेतात बैलाचे कासरे हातात घेवून तिफणने पेरणी केली.
जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ते मूर्तिजापुर, बोरगाव मंजू येथील लहान उद्योजक यांची भेट घेऊन उद्योगांची पाहणी करणार आहेत. दरम्यान, मूर्तिजापूर तालुक्यातील राजापूर खिनखिनी या गावात जाऊन त्यांनी प्रशांत साबळे यांच्या शेतात तिफन चालवून पेरणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांचे कौतुक केले. त्यामध्ये त्यांनी बराच वेळ घेतला. शेतकऱ्यांशी चौकशी करून शेतीबाबत आणि पीक कर्जाच्या मंजुरीबाबत असलेल्या अडचणींविषयी चर्चा केली. तसेच येथे असलेल्या कृषी अधिकार्यांना त्यांनी शेतकऱ्यांना बियाणांचा तुटवडा होता कामा नये अशा सूचनाही दिल्या.
दरम्यान, पावसाला सुरुवात होताच शेतकरी जोमाने पेरणीच्या कामाला लागल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. जून महिन्याला सुरुवात झाली तेव्हापासूनच शेतकऱ्यांची पेरण्यासाठी लगबग वाढलेली आहे. या महिन्याच्या पहिल्या आठवड्या जिल्ह्यात पावसाने हजेरी दिल्याने शेतातील पेरणीपूर्व कामे वेगाने सुरू झाली होती. तर, गेल्या आठवड्यात दमदार पाऊस झाल्याने, सर्वत्र पेरणीची तयारी सुरू झालेली आहे.