अमरावती -वनमंत्री संजय राठोड यांनी शुक्रवारी मेळघाटातील चिखलदरा येथे गुगामल राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली. त्यांनी वन विभागाच्या कामांचा आढावा घेतला आणि वन प्रशिक्षण संस्था, स्पायडर म्युझियमलाही भेट दिली. त्यांनी चिखलदराजवळील कोअर क्षेत्रातील वैराट शिखरावर वनसंरक्षणासाठी उभारलेल्या वायरलेस चौकीला भेट देऊन तेथील वनरक्षकांचे मनोबल वाढवले.
‘मेळघाटात कोळ्यांच्या साडेचारशेहून अधिक जाती आहेत. त्यांची पर्यावरणातील महत्त्वाची भूमिका लक्षात घेता संवर्धनाच्या, तसेच अभ्यासक, पर्यटक आदींसाठी स्पायडर म्युझियमच्या विकासाचा पाच कोटी रुपयांचा प्रस्ताव आहे. या म्युझियमसाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून देऊ,’ असे वनमंत्री राठोड म्हणाले.
‘वैराट पठारावरील गवत व कुरण विकासासाठी कॅम्प फंडामधून निधी उपलब्ध करून देण्यात येईल. कुरण विकासाने येथील तृणभक्षी प्राण्यांची संख्या वाढेल आणि त्या अनुषंगाने वाघांची संख्याही वाढण्यास मदत होईल. त्यानुसार, तृणभक्षी प्राण्यांची संख्या वाढल्यास वाघांच्या हस्तांतरणासाठी मेळघाटचा प्राधान्याने विचार करण्यात येईल,’ असेही ते पुढे म्हणाले.
चिखलदरा येथील वन प्रशिक्षण संस्थेतील मैदान विकासासह विविध सुविधा उभाराव्यात. जिल्हा नियोजन निधीत विकासासाठी प्रस्ताव द्यावेत, असे निर्देशही त्यांनी दिले. चिखलदरा तालुक्यातील पांढरी येथील स्थानिक नागरिकांच्या निवेदनानुसार पशुचराईच्या क्षेत्राच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
मेळघाटमधील विविध कामांची माहिती मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांनी सादरीकरणातून दिली. या वेळी, मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल, अप्पर प्रधान यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.