औरंगाबाद -शहरासह ग्रामीण भागात बाधित गृहविलगीकरणात राहण्यासाठी प्रयत्न करतात. मात्र, विलगीकरणाच्या नावाखाली घरात न राहता ते गावभर फिरत असल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे गावात कोरोनाचा फैलाव होत असल्याने, अशा बेजबाबदारपणाला आळा घालण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र स्थरावर तेथील शाळांत नियंत्रण कक्ष स्थापन करून गृहविलगीकरणातील व्यक्ती बाहेर फिरणार नाही यासाठी त्यांना समज द्या, असा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गोंदावले यांनी दिला आहे.
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना दिलेल्या आदेशात जिल्हा परिषदेचे शिक्षक व कर्मचारी रुग्ण संख्येनुसार सकाळी १० ते ५ नेमून बाधितांकडून फैलाव होणार नाही, याची दक्षता नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून घेण्याचे म्हटले आहे, तसेच विलगीकरणातील रुग्णांच्या कायम संपर्कात राहण्याचे सुचवले आहे.