कोल्हापूर - अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानभरपाईची रक्कम मिळवुन दिल्याबद्दल तक्रारदारकडुन दोन लाखांची लाच स्वीकारल्या प्रकरणी मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी तथा प्रभारी सहाय्यक आयुक्त यांना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे. प्रदीप केशव सुर्वे असे या अधिकाऱ्याचे नाव असून आज दुपारी ही कारवाई करण्यात आली.
तक्रारदार यांचा मत्स्य उत्पादनाचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे दोन जलाशय ठेके तत्वावर आहेत. 2019 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांच्या जलाशयातील मासे व मत्स्य उत्पादनासाठी लावलेल्या जाळ्या वाहून गेल्या होत्या. त्यावेळी महाराष्ट्र शासनाने पूरग्रस्तांसाठी नुकसानभरपाई जाहीर केली होती. त्याप्रमाणे त्यांच्या जलाशयाचे रितसर पंचनामे सुद्धा करण्यात आले होते. त्यानुसार तक्रारदार यांच्या संस्थेस नुकसान भरपाई म्हणून 26 लाख रुपये संस्थेच्या बँक खात्यावर जमा झाले आहेत. मात्र,अजूनही रक्कम तक्रारदार यांना मिळाली नाही आहे. याचाच फायदा घेत मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी सुर्वे यांनी नुकसान भरपाई मिळवून दिल्याबद्दल बक्षीस म्हणून तक्रारदाराकडे 10 लाखांची मागणी केली होती.