वर्धा - जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या आष्टी तालुक्यातील साहूर या गावातील शेतकऱ्यांचे महिन्याभरापासून पीक कर्ज मंजूर झाले नव्हते. त्यामुळे गावातील एक शेतकरी बँकेत जाब विचारण्यासाठी गेला. यात बँक कर्मचाऱ्यांशी वादावादी होऊन शेतकऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात येत आहे. आज प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष विकास दांडगे यांनी जाब विचारण्यासाठी गेले असता पुन्हा बँकेत वाद झाला आहे.
साहूरच्या बँक ऑफ इंडिया शाखेतील कर्मचारी पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. हरीश भूंभर, हा युवा शेतकरी मागील महिन्याभरापासून सात ते आठ वेळा बँकेत चकरा मारून थकला, मात्र काही झाले नाही. अखेर 30 जूनला संतप्त होत त्याने बँक मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांना जाब विचारला. यावेळी बँकेतील काही कर्मचाऱ्यांनी त्याला शिवीगाळ केली. यासह कर्जाची केस करत नाही, जे होते ते करून घे, अशा शब्दात बोलत असल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे.
याबाबत माहिती मिळताच प्रहारचे जिल्हाध्यक्ष विकास दांडगे यांनी बँकेत जाऊन जाब विचारला. यावेळी बँकेतर्फे उडवा उडवीचे उत्तर मिळत असल्याने पुन्हा वाद झाला. काही वेळासाठी वातावरण चांगलेच तापले. चर्चा करत शेतकऱ्याला कर्ज उपलब्ध करून देण्याचे सांगण्यात आले.