वर्धा - प्रलंबित पीक कर्जे निकाली काढण्यासाठी मंगळवारी भूमिपुत्र संघर्ष वाहिनीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष अभिजित फाळके पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले. सध्या कापूस घरात पडून आहे. नाफेडचा चणा खरेदी बंद आणि बँका कर्ज देत नाही. खरिपाचा हंगाम तोंडावर आला तरी बियाणे खरेदी करायला पैसा नाही, असे अनके प्रश्न असताना पैसे आणायचे तरी कोठून, असा सवाल यावेळी बँकेला करण्यात आला. बँकेकडून पीक कर्जासाठी होत असलेल्या विलंबाला कंटाळून हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर येथील शेतकरी गोपाल मेघरे यांनी याबाबत निषेध नोंदवला आहे.
कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे सीसीआय आणि नाफेडची खरेदी कासवगतीने सुरू आहे. हजारोच्या संख्यने टोकन देवून अजूनही शिल्लक असल्याने खरेदीला नंबर कधी लागेल याच्या प्रतीक्षेत वाट पाहत आहे. दुसरीकडे बँकेचे धोरण अडचण वाढवणारे आहे. बियाणे सुद्धा उधार भेटत नाही. बँकेत अर्ज केले पण अजूनही कर्ज प्रकरण मंजूर झाले नाही. याचाच पाठपुरावा करण्यासाठी शिवराय विद्यार्थी संघटना आणि भूमिपुत्र संघर्ष वाहिनीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यासह शेतकरी गोपाल मेघरे आणि शिवराय विद्यार्थी संघटनेचे नितील सेलकर यांनी मुंडन करून प्रलंबित बँक कारभाराचा निषेध केला.