मुंबई -मध्य रेल्वेच्या लांबपल्ल्याच्या गाडीत प्रवाशांची तिकीट तपासत आणि दमदाटी करून प्रवाशांकडून पैसे उकळणे बनावट तपासणीस महागात पडले आहे. प्रवाशांनी त्याला बेदम मारहाण करून पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना कामायनी एक्सप्रेसमध्ये घडली असून पोलिसांनी बनावट तपासणीसाविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
तोतया 'टीसी' बनणे पडले महागात; प्रवाशांनी चोप देऊन केले पोलिसांच्या स्वाधीन - कसारा पोलीस तोयया टीसी अटक
बुधवारी लोकमान्य टिळक टर्मिनस ते भुसावळ स्टेशन दरम्यान गाड़ी नं. 01071 डाऊन कामायनी एक्सप्रेस स्पेशल ट्रेनमध्ये एक बनावट तिकीट तपासणीस प्रवाशांची तिकीट तपासत होता.
काय आहे प्रकरण -
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी लोकमान्य टिळक टर्मिनस ते भुसावळ स्टेशन दरम्यान गाड़ी नं. 01071 डाऊन कामायनी एक्सप्रेस स्पेशल ट्रेनमध्ये एक बनावट तिकीट तपासणीस प्रवाशांची तिकीट तपासत होता. तसेच दमबाजी करीत प्रवाशांकडून पैसे लुटण्याचे काम करत असल्याची तक्रार, कर्तव्यावर असलेले मध्य रेल्वेचे तिकीट निरीक्षक हरिमंगल बलीराम यादव यांच्याकडे करण्यात आली होती. तेव्हा तिकीट निरीक्षकांनी याची दखल घेत या प्रवाशांसोबत D1 या कोचमध्ये जाऊन बघितले असता एक माणूस प्रवाशांचे तिकिट चेक करुन त्यांना दमबाजी करीत पैसे घेत होता. याबद्दल त्याला विचारले असता त्याने आपले गळ्यातील ओळखपत्र चालत्या गाडीतून फेकून देऊन तो पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याला प्रवाशांनी पकडुन लाथा बुक्यांनी मारहाण केली.
कसारा रेल्वे स्थानकातून अटक-
मध्य रेल्वेचे तिकीट निरीक्षक हरिमंगल बलीराम यादव यांनी आरोपीला विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव सोमनाथ अंबादास माळी असल्याचे सांगितले. त्यानंतर यांची तक्रार पोलिसांना दिली असता पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवून कसारा स्थानकातून आरोपीला अटक केली आहे. कल्याण लोहमार्ग पोलीस या घटनेची अधिक चौकशी करत आहे.