ब्रिस्टल- इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेयरस्टोच्या धमाकेदार शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने पाकिस्तानचा तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ६ गडी राखून पराभव केला. पाकिस्तानने इंग्लंडसमोर विजयासाठी ३५९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. इंग्लंडने हे आव्हान ४४.५ षटकांत पूर्ण करत विजय मिळविला आणि मालिकेत २-० अशी आघाडी घेतली.
पाकिस्तानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या सलामी वीरांनी धडाकेबाज सुरुवात केली. जेसन रॉय आणि बेअरस्टो यांनी पाकच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला आणि पहिल्या गड्यासाठी १५९ धावांची भागीदारी केली. जेसन रॉयने ५५ चेंडूत ७६ धावांची खेळी केली. तो फहीम अशरफच्या चेंडूवर बाद झाला.
जॉनी बेयरस्टोने ७४ चेंडूत शतक पूर्ण केले. त्याने ९३ चेंडूत १५ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने १२८ धावांची विजयी खेळी केली. त्याच्या या धमाकेदार शतकाच्या जोरावर इंग्लंडने पाकिस्तानचे आव्हान ४४.५ षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले. इंग्लंडकडून मोईन अली ४६, जो रुट ४३ आणि बेन स्टोक्सने ४६ धावाचे योगदान दिले तर पाकिस्तानकडून फहीम अशरफ, जुनेद खान आणि इमाद वसीम यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
सुरुवातीला इंग्लंडने नाणेफेक जिंकून पाकला प्रथम फलंदाजीस पाचारण केले. इमान उल हक याने १३१ चेंडूत १५१ धावांची खेळी केली. त्यामध्ये १६ चौकार आणि १ षटकाराचा समावेश होता. हॅरिस सोहेल ४१ आणि असिफ अली यांनी (५२) धावांचे योगदान दिले. इंग्लंडकडून ख्रिस वोक्सने सर्वाधिक ६७ धावा देत ४ गडी बाद केले .