मुंबई -शॉर्टसर्किटमुळे व चुकीच्या विद्युत संचाच्या मांडणीमुळे होणाऱ्या आगीच्या घटना टाळण्यासाठी सार्वजनिक व खासगी कोविड रुग्णालयाच्या विद्युत संच मांडणीचे व उदवाहनाचे निरीक्षण नोंदविण्याचे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले. तसेच निरीक्षणांचे अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.
राज्यात तांत्रिक निरीक्षणाच्या प्रक्रिया सुरूवात झाली असून सर्व विद्युत आणि उद्वाहन निरिक्षकांना कोरोनाविषयक खबरदारी घेऊन ही प्रक्रिया लवकरच पूर्ण करावी, असे आदेश दिले आहेत. तसेच यासंर्भातील एसओपी जारी केल्याची माहिती, उर्जामंत्री राऊत यांनी दिली.
रुग्णालये आणि लिफ्टसचे दहा दिवसांत निरीक्षण -
उर्जामंत्र्यांच्या आदेशानंतर ऊर्जा विभागाने या संदर्भात २६ एप्रिल एक परिपत्रक जारी केले. या परिपत्रकाच्यानंतर राज्याचे मुख्य विद्युत निरीक्षक दिनेश खोंडे यांनी राज्यातील सर्व विद्युत निरीक्षकांशी व्हीसीद्वारे या विषयावर सखोल चर्चा केली. कोरोनाविषयक खबरदारी घेऊन रूग्णालयांचे हे निरीक्षण कसे पार पाडता येईल, यावर चर्चा झाली.
स्थानिक यंत्रणा व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती यांना विश्वासात घेण्याचे निर्देशही उर्जामंत्री डॉ. राऊत यांनी दिले आहेत. सूचनांवर या बैठकीत चर्चा झाली. मुख्य विद्युत निरीक्षक खोंडे यांनी सर्व विद्युत निरीक्षकांना २८ एप्रिल रोजी एक पत्र पाठवून हे निरीक्षण कसे पार पाडायचे याबद्दल विस्तृत सूचना केल्या आहेत. रूग्णालये व लिफ्टस् यांचे निरीक्षण येत्या १० दिवसात पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
त्रूटी आढळल्यास कारवाई -
राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून विद्युत उपकरणांमध्ये होणाऱ्या बिघाडामुळे रुग्णालयामध्ये आग लागण्याच्या घटना घडल्या असून यात जीवित व वित्तहानी झाली आहे. तसेच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील खासगी व सार्वजनिक रुग्णालयावर ताण निर्माण झालेला आहे. त्यामुळे अशा ठिकाणी विजेचे अपघात व आग लागण्याची घटना घडू शकते. हे टाळण्यासाठी या प्रकारच्या निरीक्षणाचे निर्देश दिले आहेत. या निरीक्षणाबाबत आणि निरीक्षणात काही त्रुटी आढळल्यास त्याची माहिती संबंधित आपत्ती व्यवस्थापन समितीला कळवावे आणि या त्रुटीची पूर्तता केली जात आहे की नाही याची खातरजमा त्यांच्या पातळीवरही करून घेण्याची विनंती करावी, अशा सूचनाही मी दिल्या आहेत,” असे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले.
वीज दुर्घटना घडू नयेत -
निरीक्षण करताना कुणाला त्रास देणे वा कोणत्या रुग्णालयाला लक्ष्य करणे हे उद्दिष्ट नसून या रूग्णालयातील लोकांच्या जीविताला वीज दुर्घटना घडून कोणतीही हानी होऊ नये, यासाठी ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे. अनेक रुग्णालये मुळात छोटी रूग्णालये म्हणून सुरू झाली.
अचानक कोरोना रूग्ण वाढल्यामुळे त्यांना बेड वाढवावी लागली. तसेच काही कोरोना रूग्णालये घाईघाईत उभी करावी लागली. अशा रुग्णालयात विद्यमान क्षमतेनुसार त्रुटी आढळल्यास त्यांच्याबाबत कारवाईचा दृष्टीकोन न ठेवता या त्रुटी दूर करण्याबाबत रूग्णालय प्रशासनाला विश्वासात घेऊन त्यांना सूचना देण्यात याव्यात तसेच स्थानिक प्रशासनाला या त्रुटीची पूर्तता करण्याबाबत पाठपुरावा करण्याची विनंतीही करण्यात यावी, अशा सूचना खोंडे यांनी आपल्या व्हिसीमध्ये सर्वांना दिल्या आहेत. तसेच सर्वच कोरोना रुग्णालयांमध्ये कोणत्याही कारणाने वीज पुरवठा खंडित झाल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून डिझेल जनरेटरची व्यवस्था असणे बंधनकारच आहे, अशी व्यवस्था नसेल तर विद्युत निरीक्षक म्हणून कोव्हीड सेंटरला परवानगी देऊ नका,” अशा सूचनाही संबंधितांना दिल्याचे खोंडे यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यातील सार्वजनिक व खासगी रुग्णालयातील विद्युत यंत्रणेचे निरीक्षण करून त्याबाबतचे अभिप्रायासह अहवाल संबंधित आस्थापणेस कळवून त्याचे निराकरण केल्यास विद्युत यंत्रणेमुळे होणारे अपघात टाळणे शक्य होईल. तसेच सदर ठिकाणाच्या उदवाहनाचे निरीक्षण करणेही आवश्यक राहणार आहे,असे आदेश ऊर्जा विभागाने दिले आहेत.
तांत्रिक कर्मचारी २४ तास उपस्थित राहणार -
महानगरांमध्ये १५ मीटरपेक्षा उंच इमारतीत रूग्णालय असेल तर संबंधित मनपाच्या हायराईज समितीचे, विद्युत निरीक्षकाचे, अग्निशमन विभाग यांचे ना-हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. अनेकदा रुग्णालये विविध कारणांमुळे हे प्रमाणपत्र घेण्याचे टाळतात. मात्र, यानिमित्ताने निरीक्षण होते तेव्हा विद्युत मांडणी व लिफ्टसमध्ये काही त्रुटी असल्यास त्या दूर करण्याची संधी प्राप्त होते व भविष्यातील अपघात टाळणे शक्य होते. संबंधित रूग्णालयांनी जर असे उचित ना-हरकत प्रमाणपत्रे प्राप्त करून घेतली नसेल तर ती प्राप्त करून घेण्यासाठी त्यांना प्रेरित करण्याचा प्रयत्नही आम्ही करणार आहोत. याशिवाय संबंधित रुग्णालयांमध्ये विद्युत, ऑक्सिजन यंत्रणा यात बिघाड झाल्यास तत्काळ तो दूर करण्यासाठी संबंधित रूग्णालयात तांत्रिक कर्मचारी २४ तास उपस्थित रहायला हवेत, अशा सक्त सूचनाही या निरीक्षणादरम्यान रुग्णालयांना देण्यात येतील,” असेही खोंडे यांनी सांगितले.
अशी होईल तपासणी -
राज्यातील विविध रुग्णालयात एसी यंत्रणेत शॉर्टसर्किट होऊन आयसीयु कक्षात आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे आयसीयु कक्षातील अंतर्गत वायरिंग कशा प्रकारची आहे, ती सुस्थितीत आहे की नाही, आयसीयु कक्षात फाल्स सिलिंग केले आहे का, या कक्षातील एसी यंत्रणा स्प्लीट, विंडो, कॅसेट वा सेंट्रल लाईन एसी युनिट यापैकी कोणत्या प्रकारची आहे, एसी यंत्रणेचे आऊटडोअर यंत्रणेचे आउटडोअर युनिट योग्य ठिकाणी बसवलेले आहे का, त्याचे कॉपर ट्युबिंग व्यवस्थित आहे का, आयसीयु कक्षाच्या आकारमानानुसार एसीयंत्रणा पुरेशी आहे का, या यंत्रणेला आवश्यक असलेला वीज भार देण्यात आले आहे का, याशिवाय विविध घटकांची तपासणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.