पंढरपूर -सोलापूरच्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी चार एप्रिलपासून प्रचाराला सुरुवात झाली आहे. राज्यातील अनेक नेते पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यात सभा घेत आहेत. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात वाढत आहे. पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यात शुक्रवारी 193 कोरोना रुग्ण आढळले आहे. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बोराळे गावातील सभेत एकच गर्दी केली होती. त्या गावात शुक्रवारी आठ गावकरी कोरोनाने बाधित झाले.
प्रशासनाची वाढली डिकेदुखी
उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन दिवस पंढरपूर-मंगळवेढा दौऱ्यावर आहेत. आठ एप्रिल रोजी कल्याणराव काळे यांच्या सभेत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी तोबा गर्दी केली होती. सभेत कोणत्याही कोरोना नियमांचे पालन होताना दिसले नाही. त्या सभेच्या आयोजकांवर गुन्हे दाखल झाला आहे. त्यानंतर नऊ एप्रिलला अजित पवार यांनी मंगळवेढा तालुक्यात चार सभा घेतल्या. त्यात बोराळे गावातील सभा गर्दीमुळे चर्चेत राहिली. मात्र त्यानंतर गावकरी कोरोनाची लागण झालेले आढळून आले. आहे. यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
15 एप्रिलपर्यंत आणखी सभा
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघांमध्ये 15 एप्रिलपर्यंत राज्यातील वरिष्ठ नेते प्रचार करणार आहेत. या सभेल होणारी गर्दी चिंतेचा विषय ठरणार आहे. त्यात भारतीय जनता पार्टीकडून समाधान आवताडे हे रिंगणात आहेत. तर महाविकास आघाडीकडून भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यांच्या प्रचारासाठी भाजपाकडून विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह अनेक दिग्गज नेते प्रचारात उतरणार आहेत. तर राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री धनंजय मुंडे, शिवसेना नेते गुलाबराव पाटील, आमदार रोहित पवार, आमदार सुनील शेळके यांच्यासह अनेक राज्यातील नेते मतदारसंघात दाखल होणार आहे. यामुळे यांच्या सभेला होणारी गर्दी चिंता वाढवणारी आहे.