महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

कोरोना उपचारास नकार देणाऱ्या आठ आरोग्य कर्मचाऱ्यांवर "मेस्मा"अंतर्गत गुन्हे - miraj corona latest news

मिरजेत कोरोना रुग्णावर उपचार करण्यास नकार देणाऱ्या खासगी रुग्णालयातील आठ आरोग्य कर्मचाऱ्यांविरोधात ‘मेस्मा’ कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. कोरोना काळात 'मेस्मा' कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. प्रसंगी अशा रुग्णालयांचे परवानेही रद्द करण्यात येतील, असा इशारा पालिका आयुक्त कापडणीस यांनी दिला आहे.

सांगली-मिरज कोरोना न्यूज
सांगली-मिरज कोरोना न्यूज

By

Published : Jul 30, 2020, 3:25 PM IST

सांगली - मिरजेत कोरोना रुग्णावर उपचार करण्यास नकार देणाऱ्या खासगी रुग्णालयातील आठ आरोग्य कर्मचाऱ्यांविरोधात ‘मेस्मा’ कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिरजेच्या महात्मा गांधी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना काळात 'मेस्मा' कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे.

महापालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येने वाढत आहे. त्यामुळे पालिकेकडून खाजगी रुग्णालयांमध्येही कोविड सेंटर निर्माण करण्यात आली आहेत. सांगली-मिरज रस्त्यावरील एका प्रसिद्ध खासगी रुग्णालयात सुद्धा कोरोना उपचार केंद्र सुरू करण्यात आलेला आहे. मात्र, या ठिकाणी उपचारासाठी दाखल होणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांवर येथील आरोग्य कर्मचाऱ्यांनी उपचार करण्यास नकार दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

या ठिकाणी कोविड सेंटर सुरू झाल्यापासून या खासगी रुग्णालयातील आठ कर्मचारीे ड्युटीवर हजर झाले नाहीत. रुग्णालय प्रशासनाकडून त्यांना वारंवार याबाबत समज देण्यात आली होती. मात्र, तरीही त्या कर्मचाऱ्यांनी कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यास नकार दिला. याबाबत रुग्णालय प्रशासनाने सांगलीच्या जिल्हाधिकार्‍यांना याबाबतचा अहवाल पाठवला होता. यानंतर जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी सांगली महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांना याबाबतीत कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, कापडणीस यांनी पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील आंबोळी यांना याबाबत चौकशी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, आरोग्य विभागाने चौकशी करत त्या खासगी रुग्णालयातील ८ आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विरोधात "महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन अधिनियमन २००५", ''भारतीय साथरोग नियमन अधिनियम १९८७" आणि "महाराष्ट्र इसेन्शियल सर्व्हिसेस अ‌ॅण्ड मेंटेनन्स ॲक्ट २००७" या तीन कायद्यान्वये मिरजेच्या महात्मा गांधी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

आयुक्त कापडणीस यांनी याबाबत बोलताना, कोरोनाच्या काळामध्ये कोणत्याही आरोग्य कर्मचाऱ्यांनी अथवा रुग्णालयाने कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यास असमर्थता दर्शवल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. प्रसंगी संबंधित रुग्णालयाचा परवाना सुद्धा रद्द करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

ABOUT THE AUTHOR

...view details