सिंधुदुर्ग - जिल्ह्यात आठही तालुक्यांमध्ये कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात त्या त्या तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ठेवले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली. या पार्श्वभूमीवर कणकवली येथील हरकुळ बुद्रुक आणि फोंडाघाट येथील कोविड सेंटरला भेट देऊन जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली.
केंद्र तसेच राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लक्षणे नसलेल्या आणि कमी प्रमाणात लक्षणे असलेल्या रुग्णांना कोवीड केअर सेंटरमध्ये (सी. सी. सी.) ठेवण्यात येत आहे. ज्या रूग्णांना मध्यम स्वरुपाची लक्षणे आहेत अशा रुग्णांना डेडिकेटेड कोवीड हेल्थ सेंटरमध्ये (डी. सी. एच. सी.) ठेवण्यात येणार आहे. तर ज्यांना उपचारांची जास्त गरज आहे. काही इतर आजार (मधुमेह, उच्च रक्तदाब, कॅन्सर) आहेत. तसेच ज्यांचे वय 65 पेक्षा जास्त आहे, अशा रुग्णांना डेडिकेटेड कोवीड हॉस्पीटलमध्ये (डी. सी. एच) ठेवण्यात येत आहे. त्या दृष्टीने जिल्हयातील प्रत्येक तालुक्यामध्ये केंद्र आणि राज्य शासनाच्या सूचनांनुसार कोवीड केअर सेंटर उभारण्यात आले आहे.
या सेंटरमध्ये ग्रामीण रुग्णालयातील एक वैद्यकीय अधिकारी किंवा उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. हे नोडल अधिकारी रुग्णांची दररोज आरोग्य तपासणी करतील. तर एक बी. ए. एम. एस. डॉक्टर पूर्णवेळ याठिकाणी कार्यरत असणार आहेत. तसेच या ठिकाणी ऑक्सिजन सिलिंडर, पल्स ऑक्सीमीटर, रुग्णवाहिका, पीपीई किट, एन 95 मास्क या सर्व सोयी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यामार्फत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. उपचारादरम्यान कोवीड केअर सेंटरमधील रुग्णांमध्ये काही गंभीर स्वरुपाची लक्षणे उद्भवल्यास त्यांना कोवीड हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात येणार आहे.
कोवीड केअर सेंटरसाठी सर्व तालुक्यातील तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांनी जागा निश्चित करून ही केंद्रे उभारली आहेत. अशा स्वरुपाचे कोविड केअर सेंटर प्रत्येक तालुक्यात उभारण्यासाठी स्वयंसेवी संस्था तसेच इतर संस्थांनी पुढाकार घ्यावा. तसेच खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनीही या सेंटरमध्ये आपली सेवा द्यावी, स्वयंसेवकांनी सेवा देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे. या सेंटरमध्ये सेवा देऊ इच्छिणाऱ्यांनी डॉ. लक्ष्मण दुर्गवाड (मोबाईल क्रमांक 7020941328) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.