नवी दिल्ली - अभिनेता सनी देओल याला आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचे कारण देत निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे. गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातून सनी भाजपकडून निवडणूक लढवीत आहे. या मतदारसंघात १९ मे रोजी मतदान होणार आहे.
सनीच्या 'ढाई किलो'च्या हातून आचारसंहितेचे उल्लंघन, आयोगाने पाठवली नोटीस - Gurudaspur
सनी देओलने आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचे उघड झाले आहे. प्रचार संपल्यानंतरही सभा घेत होता सनी पाजी. निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस.
गुरुदासपूर मतदारसंघाचा प्रचार शुक्रवारी समाप्त झाला. प्रचार संपण्याच्या वेळेनंतरही सनी देओलची पठाणकोट येथे सभा सुरू होती. यावेळी सुमारे दोनशे लोक सभेला हजर होते. त्यांच्यासाठी लाऊड स्पीकरही सुरू होते. मतदानाच्या अगोदर ४८ तास प्रचार थांबला पाहिजे, असा निवडणूक आयोगाचा नियम आहे. हा नियम धाब्यावर बसवण्याचे काम सनीच्या 'ढाई किलो'च्या हातून घडले आहे.
गुरुदासपूर मतदारसंघात भाजपच्या सनी देओलचा मुकाबला काँग्रेसच्या सुनिल जाखड यांच्याशी आहे. चित्रपटामुळे सनीची प्रतिमा लोकप्रिय असली तरी केलेल्या विकास कामामुळे जाखड यांचे पारडे जड असल्याचे मानले जात आहे. या मतदारसंघातून भाजपच्या वतीने दिवंगत विनोद खन्ना खासदार होते. त्यांच्या निधनानंतर या जागेवर सुनिल जाखड पोडनिवडणुकीत विजयी झाले होते.