मुंबई - राज्यात कोरोनाचा कहर वाढत असताना एकदा कोरोना झाला की दुसऱ्यांदा कोरोना होतो का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर असे रुग्णही आढळत असल्याची चर्चा आहे. पण तज्ज्ञांनी मात्र दुसऱ्यांदा म्हणजे कोरोनातून पूर्णतः बरे झालेल्या पुन्हा कोरोनाची लागण होत नसल्याचा, भारतात तरी असे घडले नसल्याचा दावा केला. मात्र, कोरोना झालेले रुग्ण पुन्हा येत आहेत, त्या रुग्णांचा कोरोना पूर्ण बरा झालेला नाही वा त्यांना डिस्चार्ज देताना त्यांची चाचणी केली गेलेली नाही असे हे रुग्ण आहेत. त्यामुळे पुन्हा कोरोनाचा संसर्ग होत नसल्याने घाबरू नये पण काळजी घ्यावी, असे आवाहनही तज्ज्ञांनी केले आहे.
दुसऱ्यांदा कोरोना होतो का? जाणून घ्या, डॉक्टर काय म्हणतात
चीन आणि अमेरिकेत पुन्हा कोरोना संसर्ग झाल्याचे म्हटले जात आहे. पण, भारतात मात्र आयसीएमआरच्या नोंदणीप्रमाणे असा एकही रुग्ण आढळला नसल्याची माहिती कोव्हीड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी दिली. तर, पुन्हा कोरोना होत नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
चीन आणि अमेरिकेत पुन्हा कोरोना संसर्ग झाल्याचे म्हटले जात आहे. पण, भारतात मात्र आयसीएमआरच्या नोंदणीप्रमाणे असा एकही रुग्ण आढळला नसल्याची माहिती कोव्हीड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी दिली. तर, पुन्हा कोरोना होत नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनीही आतापर्यंत आमच्याकडे कोरोनातून बरा होऊन गेलेला रुग्ण पुन्हा कोरोना झाला म्हणून आलेला नाही, असे स्पष्ट केले आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनीही दुसऱ्यांदा कोरोना होत नसल्याचे वा तसे भारतात तरी झाले नसल्याचे सांगितले आहे. कोरोनातून बरे झालेल्यांमध्ये अँटिबॉडीज तयार होतात. त्या दोन ते सहा महिने शरीरात राहतात. त्यामुळे पुन्हा कोरोना होऊ शकत नाही. पण, हे खरे आहे की डिस्चार्ज होऊन गेलेले कोरोना रुग्ण पुन्हा येत आहेत. हे प्रमाण अगदी नगण्य आहे. पण हे रुग्ण असे आहेत की जे पूर्णतः बरे झालेले नव्हते. नव्या नियमानुसार काही जणांची चाचणी न करता त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. अशा रुग्णांमध्ये कोरोनाचा विषाणू राहतो आणि तो पुन्हा सक्रिय झाला की रुग्ण पॉझिटिव्ह येत असल्याचेही डॉ. भोंडवे यांनी सांगितले.