जळगाव -धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण लागू करण्यात यावे, ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने केली जात आहे. परंतु, शासनाकडून त्याबाबत निर्णय होत नाही. धनगर समाजासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी, धनगर ऐक्य अभियान संघटनेच्या वतीने गुरुवारी (13ऑगस्ट) जळगावात रक्तदान शिबिराचे आयोजन करत, रक्ताने लिहिलेले निवेदन शासनाला देण्यात आले.
एसटी प्रवर्गाचे आरक्षण लागू करण्यासाठी धनगर समाजबांधवांनी शासनाला दिले रक्ताने लिहिलेले निवेदन - धनगर समाज आरक्षण बातमी
धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण लागू करण्यात यावे, या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी धनगर ऐक्य अभियान संघटनेच्या वतीने गुरुवारी (13ऑगस्ट) जळगावात रक्तदान शिबिराचे आयोजन करत, रक्ताने लिहिलेले निवेदन शासनाला देण्यात आले.
महाराष्ट्र राज्यात धनगर समाज मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण लागू करण्यात यावे, ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. या मागणीसाठी धनगर समाजबांधवांच्या वतीने विविध आंदोलने करण्यात आली. शासनाकडून वेळोवेळी आरक्षण लागू करण्याचे आश्वासने देण्यात आली. परंतु, आजपर्यंत हा विषय मार्गी लागलेला नाही. आरक्षणाअभावी धनगर समाजातील तरुणांना शिक्षण घेताना तसेच नोकरीत अनेक अडचणी येत आहेत. अनेक सुविधांपासून ते वंचित राहत आहेत. त्यामुळे शासनाने धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण त्वरित लागू केले पाहिजे, अशी मागणी समाजबांधवांकडून केली जात आहे. परंतु, या मागणीकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. आरक्षणाच्या मागणीसह धनगर समाजाशी निगडित महत्त्वाच्या विषयांकडे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी जळगावात धनगर ऐक्य अभियान संघटनेच्या वतीने अभिनव उपक्रम राबवण्यात आला. रक्तदान शिबिराचे आयोजन करत संघटनेने आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले.
या रक्तदान शिबिरानंतर धनगर समाज बांधवांनी आपल्या रक्ताने विविध प्रकारच्या मागण्यांचे निवेदन लिहून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या मार्फत शासनाला सादर केले. धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण लागू करण्यात यावे, धनगर समाजाच्या विकासासाठी घोषित केलेल्या 1 हजार कोटी रुपयांची तातडीने तरतूद करण्यात यावी, मेंढपाळांना संरक्षण देऊन त्यांच्यावर होणारे हल्ले थांबवावे, अशा प्रकारच्या मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.