नागपूर - कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू होईल की नाही, असा प्रश्न सर्व पालकांना पडलेला असताना गेल्या काही दिवसांमध्ये खासगी शाळांनी ऑनलाईन शिक्षण सुरू केलेले आहे. त्यामुळे पालकांवर अतिरिक्त आर्थिक ताण आलेला आहे. ऑनलाईन वर्गांच्या माध्यमातून शिकवणीला सुरुवात करताच खासगी शाळांनी शुल्क वसुलीसाठी पालकांकडे तगादादेखील लावायला सुरुवात केली आहे. या संदर्भात शिक्षण उपसंचालक कार्यालयात तक्रारींचा ओघ वाढला आहे. त्यामुळे शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांनी एक आदेश काढला आहे, ज्यामध्ये ऑनलाईन शाळा सुरू करू नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
कोरोनाच्या संकट काळात शाळा कधी सुरू होतील हे अजूनही स्पष्ट नाहीये. राज्य सरकार त्याबाबत पूर्वतायरीला लागले असताना अनेक शिक्षण संस्था व शाळांनी ऑनलाईन शिक्षण सुरू केले. हे ऑनलाईन शिक्षण वर्ग त्वरित बंद करण्याचे आदेश नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालकांनी दिले आहेत. कोरोनाचा प्रदुर्भाव टाळण्यासाठी मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच राज्यातील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. यंदा परीक्षाही घेण्यात आल्या नसून विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याच्या सूचना शिक्षण मंडळाने दिल्या आहेत. मात्र, आता मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून अनेक शाळांनी ऑनलाईन शिक्षण वर्ग सुरू केले आहेत. काही शाळांनी तर नर्सरी पासूनचे ऑनलाईन वर्ग सुरू केले आहेत.