महाराष्ट्र

maharashtra

मुंबई पालिका रुग्णालयातील बंधपत्रित डॉक्टरांची पगारवाढीची मागणी

By

Published : Jun 16, 2020, 4:51 PM IST

महाराष्ट्र असोसिएशन ऑफ बॉण्डेड रेसिडेन्स डॉक्टर संघटनेने पगारात एकसमानता आणत 25 हजारांची वाढ द्यावी अशी मागणी केली आहे. मुंबईत केईएम, नायर, सायन, कूपर रुग्णालयांसह अन्य 18 रुग्णालयात असे अंदाजे 500 डॉक्टर आहेत. त्यानुसार या डॉक्टरांनी डायरेक्टर ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड मेजर हॉस्पिटल्स यांच्याकडे ही मागणी केली आहे.

पालिका रुग्णालयातील बांधपत्रित डॉक्टरांनाचीही पगारवाढीची मागणी
पालिका रुग्णालयातील बांधपत्रित डॉक्टरांनाचीही पगारवाढीची मागणी

मुंबई - कोरोनासाठी सेवा देणाऱ्या इंटर्न आणि निवासी डॉक्टरांना पगारवाढ देण्यात आली आहे. तर निवासी डॉक्टर कायमस्वरूपी पगारवाढ मागत असतानाच आता मुंबई महानगरपालिका रुग्णालयातील बंधपत्रित निवासी डॉक्टरांनीही पगारवाढीची मागणी केली आहे. या डॉक्टरांनी 25 हजार रुपयांची वाढ मागितली असून यासाठी सरकार सकारात्मक असल्याचे समजत आहे.

काही दिवसांपूर्वी जिल्हास्तरीय बंधपत्रित डॉक्टरांना सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत पगारवाढ देण्यात आली आहे. मात्र, मुंबईतील पालिका रुग्णालयातील बंधपत्रित वरिष्ठ निवासी डॉक्टरांना पगारवाढ मिळालेली नाही. त्यात हे वरिष्ठ निवासी डॉक्टर सध्या कोरोनासाठी सेवा देत आहेत. त्यातच या डॉक्टरांच्या पदामध्ये तीन वर्गवारी असून त्यांच्या पगारात एकसमानता नाही. 54 हजार ते 80 हजार दरम्यान त्यांना पगार मिळतो. त्यामुळे आता महाराष्ट्र असोसिएशन ऑफ बॉण्डेड रेसिडेन्स डॉक्टर संघटनेने पगारात एकसमानता आणत 25 हजारांची वाढ द्यावी अशी मागणी केली आहे.

मुंबईत केईएम, नायर, सायन, कूपर रुग्णालयांसह अन्य 18 रुग्णालयात असे अंदाजे 500 डॉक्टर आहेत. त्यानुसार या डॉक्टरांनी डायरेक्टर ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड मेजर हॉस्पिटल्स यांच्याकडे ही मागणी केली आहे. तर, संचालकांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तर, आता सरकारचा हिरवा कंदील कधी मिळतो, याकडेच या डॉक्टरांचे डोळे लागले आहेत. दरम्यान निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेनेही राज्यभरातील निवासी डॉक्टरांना कायमस्वरूपी 10 हजार रुपयांची वाढ द्यावी अशी मागणी केली आहे. यासाठी सरकार सकारात्मक असल्याचे समजते. सध्या कोरोनासाठी काम करणाऱ्याच निवासी डॉक्टरांना 10 हजार अतिरिक्त पगार मिळतो.

ABOUT THE AUTHOR

...view details