नवी दिल्ली -मागील आठवड्यात दिल्ली सरकारने आपल्या सर्व सीमा सील केल्या होत्या. मात्र, उद्या(सोमवार) पासून केजरीवाल सरकारने आंतरराज्य वाहतुकीस परवानगी दिली आहे. ‘उद्यापासून दिल्लीच्या सीमा आम्ही खुल्या करत आहोत’, असे केजरीवाल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सांगितले.
कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे दिल्ली सरकारने मागील आठवड्यात आपल्या सर्व सीमा बंद केल्या होत्या. अत्यावश्यक सेवा वगळता दिल्ली बाहेरील नागरिकांसाठी प्रवेश बंद ठेवला होता.
'दिल्लीतील रुग्णालये फक्त दिल्लीतील नागरिकांसाठी उपलब्ध असतील तर केंद्राच्या अखत्यारितील रुग्णालये सर्वांसाठी खुले असतील. जूनच्या शेवटीपर्यंत दिल्लीला 15 हजार खाटांची गरज भासणार आहे, असे केजरीवाल म्हणाले.
याशिवाय दिल्ली सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. मद्य विक्रीवर लावण्यात आलेली किमतींच्या 70 टक्के 'कोरोना फी' मागे घेतली आहे. सर्व प्रकारच्या मद्यावर सरकारने 70 टक्क्यांपर्यंत कोरोना अधिभार लावला होता. आता तो मागे घेण्यात आला आहे. हॉटेल्स आणि बँक्वेट्स हॉल्स सोडून दिल्लीतील इतर सर्व मॉल, रेस्टॉरंट, धार्मिक स्थळे सोमवारपासून सुरु होणार असल्याचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सांगितले.