नाशिक - 2016 च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोइंगपटू दत्तू भोकनळ विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कथित पत्नीने दत्तूवर शारीरिक व मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. त्यानुसार दत्तूवर कलम 498/ 420 नुसार आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी महिला ही नाशिक ग्रामीण पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. कथित पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार, दत्तू आणि त्याची पोलीस शिपाई असलेली कथीत पत्नी यांची चांदवड तालुक्यातील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने भेट झाली होती. त्यानंतर गावाच्या जवळ असल्यामुळे त्यांच्यात मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.
त्यानंतर त्यांनी आळंदी येथे जाऊन वैदिक पद्धतीने लग्न करण्याचे ठरविले. त्यावेळी पुण्यात दत्तू हा रोइंगचा सराव करत होता. त्यानंतर दत्तू आणि या महिलेने आळंदी येथे वैदिक पद्धतीने लग्न केले.
मात्र, नाशिकला गावाकडे कोणालाही या प्रकरणाची माहिती नव्हती. दोघांनी मिळून थाटात लग्न करायचे, असे ठरवले होते. दोन वर्षांनी फेब्रुवारी महिन्यात लग्न करण्याचे निश्चित झाले. लग्नाला दोन दिवस शिल्लक असताना दत्तू भोकनळने तब्येत बरी नसून रुग्णालयात उपचार घेत असल्याचे सांगितले. त्यानंतर पुन्हा पुढील महिन्याची तारीख निश्चित करण्यात आली.
त्यानुसार, सर्वांना निमंत्रणही देण्यात आले, पाहुणे मंडळी जमली असतांना दोन दिवस आधीच दत्तूने लग्नास नकार देत पुन्हा लग्नाचा विषय काढू नको, मी कुठल्याही परिस्थितीत तुझ्याशी लग्न करू शकत नसल्याचे सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच पत्नीने आडगाव पोलीस ठाणे गाठून त्याच्या विरोधात शारीरिक व मानसिक छळ आणि फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे क्रीडा क्षेत्रात खळबळ उडाली आहे.